भाईंदर : महाराष्ट्र दिनानिमित्त युवा प्रतिष्ठानने मीरा-भाईंदर शहरातील घोडबंदर व धारावी या दोन किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे सापडल्याने गडप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी युवा प्रतिष्ठान संस्थेसह शहरातील अन्य सामाजिक संघटनांनी घोडबंदर व धारावी किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवली होती. या मोहिमेत सकाळी ८ वाजता घोडबंदर किल्ल्याची पाहणी करून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात बुरुजावर वाढलेली छोटीछोटी झाडे, गवत आदी काढण्यात आले. यावेळी किल्ल्यावर प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्यांसह सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या सापडल्या. त्यानंतर, सकाळी ११ पासून भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्ल्याची स्वच्छता मोहीम घेण्यात आली. येथेही दारूच्या बाटल्या आढळल्या.
या परिसरात १८८७ मध्ये गायमुख नावाच्या झऱ्याचे पाणी साठवण्यासाठी बांधलेली पाण्याची टाकी लवकरच स्वच्छ करण्याचे नियोजन करण्यात आले. स्वच्छतेनंतर किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष गणेश बामणे, सचिव आशीष लोटणकर, खजिनदार श्रेयस सावंत, दादा पाटील, आदित्य शिवदास, प्रशांत मोरे, निलेश मोरे, शुभम ढोके, प्रभाकर कोरटे, रावसाहेब पानपट्टे, चेतन गडाळे, भुवनेश राऊत, विजय वाघमारे, सुनील कदम, निखिल पाटील व प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. हे दोन्ही किल्ले ऐतिहासिक आणि संरक्षित असताना महापालिका, सरकार व पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने मद्यपी, गर्दुल्ल्यांचे अड्डे बनले आहेत. नियमित सफाई केली जात नाही. अतिक्र मण वाढत असल्याबद्दलही गडप्रेमींनी संताप व्यक्त केला.