डोंबिवली : वर्षानुवर्षे म्हात्रेनगर प्रभागात कार्यरत असलेले स्वच्छता निरीक्षक विलास गायकवाड यांची बदली करावी, अशी मागणी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये गुरुवारी त्याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी सकाळीच गायकवाड यांची बदली केली. रामनगर प्रभागातील स्वच्छता निरीक्षक प्रसाद पुजारे यांच्यावर आता म्हात्रेनगर प्रभागाचीही जबाबदारी सोपवली आहे.म्हात्रेनगर प्रभागात अंबिकाधाम, सुदामा सोसायटी, अयप्पा मंदिर, तपस्या इमारतीजवळ, येवतेश्वर इमारतीनजीक, शिवसेना शाखेजवळील पडीक घर, संकेत इमारत आदी सर्व ठिकाणी कचरा जमा होत असल्याची माहिती पेडणेकर यांनी जोशी यांना दिली. त्यावर तेथेही स्वच्छता केली जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले.म्हात्रेनगर प्रभागात योग्य पद्धतीने स्वच्छता होत नसल्याची तक्रार पेडणेकर यांनी आयुक्तांकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर पुजारे यांनी पेडणेकर यांच्याशी चर्चा करून प्रभागात कुठे कचरा जमा होतो, याचा आढावा घेतला. तसेच त्या जागांची पाहणी करत संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना तेथे स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, सकाळपासून स्वच्छता निरीक्षक प्रभागात आल्याने तसेच स्वच्छता दिसू लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
स्वच्छता निरीक्षकाची अखेर झाली बदली; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:55 AM