भार्इंदर : कंत्राटी सफाई कामगार कपातीच्या वादावर दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. या विषयावर गुरुवारी पालिका मुख्यालयात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. यात महापौर गीता जैन यांनी कपातीच्या मंजूर ठरावाबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.बैठकीला आमदार प्रताप सरनाईक, नरेंद्र मेहता, श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, महापौर गीता जैन, आयुक्त अच्युत हांगे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आयुक्तांनी कामगारांना किमान वेतन लागू केल्याने पालिकेवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडला आहे. तो कमी करण्यासाठीच कपातीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यावर, काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे सहा हजार सफाई कामगार नियुक्त करणे अपेक्षित आहे. तेवढे कामगार नियुक्त न करता किमान चार हजार कामगार आवश्यक असतानाही सध्या असलेल्या कामगारांची कपात केल्यास स्वच्छतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली. त्याहीपेक्षा किमान तीन हजार कामगार नियुक्त करणे आवश्यक आहे. १९०० कंत्राटी कामगारांतून ३०० कामगार कपात केल्यास १४०० स्थायी सफाई कामगारांना त्यात सामावून घेण्याची सूचना पंडित यांनी केली. परंतु, पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने जास्त कामगार नियुक्त केल्यास विकासावर परिणाम होण्याचे संकेत आयुक्तांनी देताच पंडित यांनी स्थानिक प्रशासन केवळ विकासासाठी नव्हे तर नागरिकांना सेवा देण्यासाठी असते. राज्य सरकारकडून विकास होईल, त्यासाठी सरकारकडे निधीची मागणी करा, अशा शब्दांत पंडित यांनी सुनावले. तसेच कमी कामगारांमध्ये शहराची स्वच्छता सुरू राहिल्यास बोजवारा उडून आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे तज्ज्ञांच्या अहवालानुसार पालिकेवर कारवाई होईल, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
सफाई कामगारांचा फैसला आज
By admin | Published: April 23, 2016 1:56 AM