लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवली पश्चिममधील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत मोठा गाव ठाकुर्ली ते रिंग रोडपर्यंतच्या रस्ता आणि रेल्वे क्रॉसिंग ते दीनदयाळ रोड या दोन रस्त्यांच्या मंजुरीची अधिसूचना राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढली आहे.
दिवा-वसई या मार्गावर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प जात आहे. मोठा गाव ठाकुर्ली येथे रेल्वे क्रॉसिंग आहे. मोठा गाव ठाकुर्ली रेल्वे क्रॉसिंग ते रिंग रोडपर्यंतचा रस्ता विकास आराखड्यात १५ मीटर रुंदीचा होता. तो २४ मीटर रुंदीचा करण्यास मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर रेल्वे क्रॉसिंग ते दीनदयाळ हा ३०० मीटर लांबीचा रस्ता २४ मीटर रुंदीचा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील एक प्रस्ताव महापालिकेच्या महासभेने मंजूर केला होता. अंतिम मंजुरीसाठी तो राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठविला होता. हा रस्ता झाल्याने रस्ता प्रशस्त होणार आहे. रिंग रोड आणि त्याला लागून मोठा गाव ठाकुर्ली ते माणकोली खाडी पूल तयार केला जात आहे. त्यासाठीही रिंग रोडकडे जाणारा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. रिंग रोड हा ३१ किलोमीटरचा लांबी आहे, तसेच मोठा गाव ठाकुर्ली ते दुर्गाडी हा रिंग रोड प्रकल्पातील तिसरा टप्पा आहे. त्याच्या कामालाही लवकर सुरुवात होणार आहे, अशी माहिती नगररचनाकार राजेश मोरे यांनी दिली आहे.
-----------
रिंग रोडही होणार सुसाट
रिंग रोड हा दुर्गाडी ते मांडा-टिटवाळा यादरम्यान १७ किलोमीटर अंतराचा असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होताच तो टप्प्याटप्प्याने महापालिकेस हस्तांतरित केला जाणार आहे. मात्र, या रस्त्यादरम्यान बाळकृष्ण पेपर मिल होती. हा रस्ता मिलच्या जागेतून जात होता. हा रस्ता मिलच्या बाहेरून काढला जावा यासाठी कंपनी राज्य सरकारकडे अपिलात गेली होती, तसेच महापालिकेने त्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. राज्य सरकारने कंपनीच्या बाहेरून रस्ता काढण्यास मंजुरी देऊन तशी अधिसूचनाही काढली आहे. त्यामुळे रिंग रोडचे कंपनीच्या टप्प्यातील रखडलेले काम मार्गी लागणार आहे. बाळकृष्ण पेपर मिल ही महापालिकेच्या हद्दीतील रोजगार देणारी पहिली मिल होती. त्यामुळे तिच्या जागेतून जाणारा रस्ता बायपास केला जावा, याच्या समर्थनार्थ महापालिका प्रशासनाही होते, अशी माहिती सहायक संचालक नगररचनाकार मा.द. राठोड यांनी दिली.
----------------------