लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : परदेशात निर्यात करण्याच्या दृष्टीने ठाणे व पालघर जिल्ह्यातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे आता हापूस आंबा उत्पादक व विक्रेत्यांची नोंदणी करण्यासाठी कृषी विभागाने शोधाशोध सुरू केली आहे. एवढेच नव्हेतर, आता या आंबा उत्पादकांचे शिबिर घेऊन त्यांच्याकडून युरोप देशासह अन्य देशात या हापूसची निर्यात करण्यासाठी कागदोपत्री परवानग्या पूर्ण करण्याचे काम या दोन्ही जिल्ह्यांत कृषी विभागाने हाती घेतले आहे.
कोकणचा राजा म्हणून हापूस आंब्याला देशासह परदेशात मोठी मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या हापूस आंब्याप्रमाणेच आता ठाणे, पालघर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या हापूस आंब्याला परदेशात पाठविण्याच्या दृष्टीने भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील हापूस आंबा परदेशात पाठविण्यासाठी येथील आंबा उत्पादक शेतकरी व विक्रेते आदींचा शोध घेऊन त्यांची रजिस्टर नोंदणी केली जात आहे.
जिल्ह्यात या ४७२ हापूस आंबा उत्पादक व उत्पादक सहकारी संस्था व शेतकरी आहेत. शेतकरीव्यतिरिक्त, प्रक्रियाकर, विक्रेते, निर्यातदार आदी ९३ जणांचा यात समावेश आहे. या तब्बल ५६५ संस्था, व्यक्तींसह इतर ३८३ संस्था नोंदणीकृत असून एकूण ९४८ ची नोंदणी कृषी विभागाने युद्धपातळीवर सुरू केली आहे, असे कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.
आता रत्नागिरीला जाण्याची गरज नाही
- ठाणे, पालघर जिल्ह्यांतील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी रत्नागिरी येथे कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या ऑफिसमध्ये जाण्याची आता गरज नाही.
- मात्र, या संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे सत्यधर्म आश्रम, वाफेपाडा, ता. शहपूर येथे २८ सप्टेंबरला उपस्थित राहून शेतकऱ्यांची, कंपनीची, सोसायटी, विक्रेते उत्पादकांची नोंदणी करणार आहेत. या दिवशी शेतकरी नोंदणी मेळाव्याचे आयोजन केल्याचे माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.
- शेतकऱ्यांना ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. यासाठी हापूस आंबा लागवड असलेल्या जमिनीचे सातबारा उतारे, आंबा बागेच्या जमिनीचा नकाशा आदी कागदपत्रे द्यावी लागत आहेत.
----------------