मीरारोड - भाईंदरच्या उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात एका महिलेकडून २५ हजारांची लाच घेताना मुख्य लिपिकास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली. एका महिलेच्या तक्रारी वरून गृहनिर्माण संस्थेला नोटीस बजावणे, व्यवस्थापक ठेवणे व लेखापरीक्षण करण्याकरीता मुख्य लिपिक शेख अली हैदर दगडू मिया (३५) ह्याने ५० हजारांची लाच २८ ऑगस्ट तेजी मागितली होती. तडजोडी नंतर शेख याने ४५ हजार रुपयांवर लाचेची रक्कम नक्की केली.
महिलेने या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार केल्यावर पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे व अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन थोरात सह भावसार, तारी, पारधी, ठोंबरे, सांबरे यांच्या पथकाने मंगळवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचला. शेख याने महिले कडून पहिला हप्ता म्हणून लाचेची २५ हजारांची रोकड घेतल्यावर त्याला पोलीस पथकाने अटक केली.
या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शेख हा पूर्वी भाईंदर कार्यालयात असताना वादग्रस्त ठरला होता. त्याचे येथून बदली झाली होती. मात्र काही महिन्या आधीच त्याने स्वतःची पुन्हा भाईंदर कार्यालयात बदली करून भेटली होती. या आधी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेत कारभार सुधारा, भ्रष्टाचार बंद करा अन्यथा कारवाई करायला लावू अशी तंबी दिली होती.