ठाणे : नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी महिनाभर आधी जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात करण्यात येणारे नोटीस अर्ज आता आॅनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. यामुळे सततचे खेटे घालून त्रस्त झालेली विवाहेच्छुक जोडपी आता थेट लग्नाच्या दिवशीच जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात पाऊल ठेवू शकतील. रविवारपासून ही पद्धत सुरू झाली असून त्या दिवशी तीन जोडप्यांनी अर्ज आॅनलाइन भरले, अशी माहिती कार्यालयाने दिली.जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी जिल्हाभरातून जोडपी येतात. १ जानेवारी, आगळीवेगळी तारीख, अक्षयतृतीया, गुढीपाडवा, व्हॅलेंटाइन डे अशा मुहूर्तांवर लग्नाच्या बेडीत अडकण्याची जोडप्यांमध्ये क्रेझ असते. या दिवशी नेहमीपेक्षा तिप्पट, चौपट विवाहांची नोंदणी करण्यात येते. परंतु, नोंदणी पद्धतीने विवाहासाठी जोडप्यांना एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. हा अर्ज घेऊन पुन्हा जमा करण्यासाठी जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात खेटे मारावे लागतात. लग्नाची तारीख निश्चित झाल्यावर पुन्हा लग्नासाठी नोंदणी कार्यालयाचा रस्ता धरावा लागतो. या सर्व प्रक्रियेत त्यांना तीन टप्प्यांतून जावे लागत होते. नोटीस अर्ज मिळवण्यासाठी तीन-चार वेळा खेपा घातल्या तरी तो वेळेत मिळतच नाही, अशा अनेकांच्या तक्रारींचा सूर होता. त्यामुळे या जोडप्यांच्या सोयीसाठी आता हे नोटीस अर्ज आॅनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. अर्ज आॅनलाइन भरल्यावर संबंधित जोडप्यांना सिस्टीमद्वारे नोटीस क्रमांक आणि ३० दिवसांनंतर आणि ६० दिवसांच्या आधी येण्यासंदर्भात एसएमएस केला जातो. जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने दिलेल्या ठरावीक वेळेत जोडपी विवाहासाठी येऊ शकतात, असे वरिष्ठ लिपिक प्रवीण गिरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या आॅनलाइन पद्धतीमुळे जोडप्यांच्या अर्ज भरण्यासंदर्भात असलेल्या तक्रारी दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या आॅनलाइनसाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. नोटीस अर्ज देण्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी संकेतस्थळावर जाऊन आॅनलाइन सर्व्हिसेस या सदराखाली मॅरेज रजिस्ट्रेशनमध्ये आॅनलाइन नोटीस मॅरेज या सुविधेमार्फत घरबसल्या नोटीस देता येईल. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन संबंधित कार्यालयाने केले आहे.आॅनलाइन नोटीस देण्याकरिता आवश्यक कागदपत्रेवधू व वर यांचे आधारकार्ड, मोबाइल क्रमांकवधू व वर यांच्या वयाचा पुरावा, ओळखीचा पुरावा, वास्तव्याचा पुरावातीन साक्षीदारांच्या ओळखीचापुरावा, वास्तव्याचा पुरावा
विवाह नोटिशीकरिता खेटे मारणे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:11 AM