ठाणे : ठाणे-पनवेल-वाशी ही एसी लोकल बंद करून पूर्वीप्रमाणेच रेल्वेसेवा सुरू ठेवा, अशी मागणी ठाण्यातील ३६ महिला प्रवाशांनी केली आहे. यासाठी त्यांनी शुक्रवारी ठाणे रेल्वे प्रबंधक आर.के. मीना यांची भेट घेऊन त्यांना आपल्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले आहे.
या निवेदनात, ठाणे ते पनवेल एसी सेवा सुरू करून आनंदाची बातमी रेल्वे प्रशासनाने दिली. परंतु, रोजचा प्रवास पाहता या सेवेचे तिकीट व महिन्याचा पास सर्वसामान्य प्रवाशांना न परवडणारा आहे. तसेच प्रवाशांच्या कार्यालयीन वेळेनुसार रेल्वेने काही लोकल रद्द करून त्याठिकाणी नवीन एसी सेवा सुरू केली.
परंतु, तिकिटाचे दर पाहता त्या लोकलमधून कोणीही प्रवास करत नसल्याने फलाट क्रमांक ९ ते १० वरील सकाळी व संध्याकाळच्या वेळेस जीवघेणा प्रवास सुरू झाला आहे. याकडे रेल्वे यंत्रणा अक्षरश: दुर्लक्ष करीत असल्याचे म्हटले आहे. तसेच याचा परिणाम कार्यालयीन वेळेवर, तसेच दहावी, बारावी व कॉलेजच्या परीक्षा सुरू होत असून त्याच्यावरही परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.