लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील शहरे आणि गावखेड्यात काही अपरिहार्य कारणांखाली ठिकठिकाणी शासनाची काही शिधावाटप दुकाने बंद आहेत; परंतु आता या बंद दुकानांचे सर्वेक्षण करून माहिती घेण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यात मुरबाड, शहापूर तालुक्यांसह जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या बंद दुकानांचा शोध घेतला जात आहे. त्यानंतर ही दुकाने पुनर्जीवित होऊन जिल्ह्यातील रेशनिंग अन्नधान्याचा पुरवठा वाढण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे.
नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा तयार झाला आहे. तो अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी व ग्रामीण भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांच्या मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती दिली होती; पण आता ती उठविली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या आता वाढणार असल्याचे बोलले जात आहे; परंतु खरे तर नवीन दुकाने वाढणार नसून काही कारणास्तव बंद असलेली दुकाने सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याकरिता जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद असलेल्या दुकांनाची माहिती संकलित करण्याचे काम जिल्ह्यातील शहरात व ग्रामीण भागात सध्या सुरू झाले.
या बंद दुकानांची माहिती संकलित केल्यानंतर एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. त्याद्वारे या रेशनिंग दुकानांना चालवण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येतील. शासनाच्या निकषांवर या दुकानदारांची निवड करण्यात येत आहे. त्यामुळे किती दुकाने सुरू होतील हे सांगता येत नाही; पण २०१७-१८ ला ठाणे-मुंबईसाठी ४२४ दुकानांची जाहिरात प्रसिद्ध केली होती; पण शासन निर्णयानुसार ती स्थगित करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने माहिती घेतली जात आहे. या प्राप्त माहितीवर मुंबईतील मुख्य कार्यालय निर्णय घेईल, असे शिधावाटप ठाणे फ परिमंडळ उपनियंत्रक ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी सांगितले.
--------