ठाणे : आगरी बोली भाषेच्या संवर्धनार्थ तिच्या प्रचार-प्रसार करण्याचा उद्देशाने चालू झालेल्या ‘आगरी शाला’ या उपक्रमाची २० मे २०१८ रोजी सांगता झाली. या आगरी शालेत दहा सत्र झाले तसेच एकूण ५० हून अधिक प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थींमध्ये पोलीस,अधिकारी,डाॅक्टर,अभियंता,साहित्यिक,वकील,समाजसेवक अश्या उच्चशिक्षीतांपासून सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला. सहभागी प्रशिक्षणार्थी पुणे,पेण,अलिबाग,उरण,नवी मुंबंई,पनवेल,मुंबई असे ठिकठिकाणावरून आले होते त्यात आगरी-बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही समावेश होता. १९ मे रोजी झालेल्या आगरी शालेच्या सत्रात उत्क्रांतिवाद म्हणजेच सजीवसृष्टी जन्माला कशी आली हे शास्त्रज्ञ डार्विन,एॅरीस्टाॅटल वा इतरांच्या सिध्दांत मांडण्याआधी आगरी समाजातील स्त्रियांनी ‘धवला’ या साहित्यप्रकारात पुरातन काळापासून मांडला आहे हे दया नाईक यांनी मार्गदर्शन करीत ‘जीवसृष्टी निर्मीतीचा’ आगरी धवला सादर केला.त्यानंतर आगरी बोलीत माणसाच्या जन्मापासुन ‘तिजोरा’ ते मृत्यू पच्छात ‘गाऊत्री’ ह्या विधी सांगत आगरी बोली किती समृध्द आहे हे सांगीतले. आगरी समाजाला पौराहित्य करण्यासाठी संस्कृत वा इतर तिसर्या व्यक्तींची गरज न लागता ते करण्यासाठी आगरी बोलीत पौराहित्याचं काम ‘धवलारीनी’ आणि ‘भगत’ पुरातन काळापासून करीत असल्याचे सर्वेश तरे यांनी नमूद केले. २० मे रोजी आगरी शालेच्या दहाव्या सत्रात प्रविण पाटील आणि त्यांची मुलगी स्वरा यांनी ‘पम्याची पोर,टवाल खोर’ ही आगरी नाटिका सादर करून प्रशिक्षणार्थींमध्ये हश्या पिकवला. त्यानंतर ऍड. शंकर भोईर यांनी रामायणाचे प्रसंग आगरी कोडी घालून ओळखण्याचा एक वेगळाच खेळ सादर केला. प्रकाश पाटील (पनवेल) यांनी त्यापुढे ‘आगरी महाभारत’ विनोदी शैलीत सादर करीत जूगार न खेळण्याचा संदेश दिला. यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना अल्ट्रा मराठी तर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या आगरी शालेत मार्गदर्शन करण्यासाठी मोरेश्वर पाटील,गजानन पाटील,प्रकाश पाटील,दया नाईक,सर्वेश तरे उपस्थित होते त्यांचा सत्कार ठाणे मनविसेचे उपाध्यक्ष किरण पाटील यांनी केला तसेच आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की आगरी साहित्याला,भाषेला राजाश्रयाची नितांत गरज आहे,आगरी शाला या अभिनव उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी इतके आगरी समाजाचे लेकप्रतिनिधी असताना एकही लोकप्रतिनीधी आले नाही ही खंताची गोष्ट आहे. या आगरी शालेची सांगता करताना ‘इतक्या चांगल्या प्रतिसादानंतर आम्हाला आगरी शाला सुरू करण्याचे आमंत्रण ठिकठिकाणावरून आले असून आपण पुन्हा सुरू करू’ असे युवा साहित्यक सर्वेश तरे यांनी सांगीतले