ठाणे : देशभरात सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य झाला असला तरी त्याच्या अंमलबजावणीचे तीनतेरा वाजले आहेत. हॉलमार्किंगचा कारभार सरकारकडून मनमानी पद्धतीने हाकला जात असल्याप्रकरणी आता सराफांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हॉलमार्किंग सक्तीविरोधात सोमवारी सराफांनी राज्यव्यापी बंद पाळला. यात ठाण्यातील व्यावसायिकसुद्धा सामील झाले होते.
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती केली आहे. ती अन्यायकारक असून त्यामुळे सराफ व्यवसाय धोक्यात येईल, असे सराफ संघटनांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या सक्तीचा निषेध नोंदवण्यासाठी सर्व सराफांनी हा बंद पाळून केंद्र सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली.
केंद्र सरकारकडून १६ जूनपासून देशभरात हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी झाली होती. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. मात्र, या सगळ्याविषयी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. सध्याच्या प्रणालीच्या माध्यमातून दागिन्यांच्या हॉलमार्किंग ५ ते १० दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हॉलमार्किंगमुळे सोन्यात कोणतीही भेसळ होणार नाही, असे सरकारला वाटते. मात्र, लहान व्यापाऱ्यांना सरकारने केवळ आपल्यावर नजर ठेवण्यासाठी हॉलमार्किंगचा नियम केल्याची भावना आहे.
.........
हॉलमार्कची प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आहे. अशा पद्धतीने दागिने हॉलमार्क करवून घ्यायचे झाल्यास यंदा तयार झालेल्या दागिन्यांना हॉलमार्क करवून घेण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे केंद्राने यावर तत्काळ तोडगा काढावा.
- कमलेश श्रीश्रीमाल, अध्यक्ष, ठाणे ज्वेलर्स असोसिएशन