ठाणे : कोपरी पूर्व येथे मागील अनेक वर्षांपासून बेधडकपणे सुरु असलेल्या बेकायदेशीर खाजगी बस वाहतुकीविरोधात येत्या गुरुवारी, ६ एप्रिल रोजी कोपरी संघर्ष समिती कोपरी बंदची हाक दिली आहे. यासाठी प्रशासनाच्या निष्क्रीय धोरणाच्या निषेधार्थ सुसंस्कृत कोपरी -सुरक्षित कोपरी आणि प्रदूषणमुक्त कोपरी असा नारा दिला आहे. ठाणे पूर्व येथील सिद्धार्थनगर ते हसीज कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा खासगी बस गाड्यांची रेलचेल असते. यामुळे या परिसरात सकाळ व संध्याकाळच्या वेळी मोठया प्रमाणात वाहतूककोंडीला कोपरीकरांना सामोरे जावे लागत होते. त्यातच या ठिकाणाहून ठाणे महापालिका परिवहन विभागाची बससेवा सुरळीत व पुरेशा प्रमाणात नसल्याने शहराच्या बाह्य भागातून ठाणे स्थानकापर्यंत बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्या सर्वाधिक घोडबंदर ते ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात हसीज कॉर्नरपर्यंत येत असतात. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अपघातानंतर कोपरीवासीयांनी एकत्र येऊन या बस गाड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन तीव्र विरोध दर्शविला. तो पाहून अखेर पोलिसांनी या बस चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला. घोडबंदर येथून येणाऱ्या खासगी बस व कंपनीच्या बस बारा बंगला येथे थांबविण्यात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे बारा बंगला येथे सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत पोलिसांची कारवाई सुरू आहे.एकीकडे अरु ंद रस्त्यांमुळे निवासी क्षेत्र असलेल्या कोपरीतील वाहतूककोंडीने उग्र रूप धारण केलेले असतानाच, दुसरीकडे स्थानिक नागरिकांचे जगणेदेखील यामुळे धोकादायक बनले आहे. सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या या घटनांमुळे प्रशासनाला आणखी किती बळी हवेत...? असा संतप्त सवाल आता कोपरीवासी प्रशासनाला करत आहेत. (प्रतिनिधी) अपघात रोखणार कोण?सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या या घटनांमुळे ठाणे वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस प्रशासन यांचा तीव्र निषेध करण्यासाठी, कोपरी बंदची हाक दिल्याची माहिती समितीने एका पत्रकाद्वारे दिली.
खासगी बसविरोधात ६ एप्रिलला कोपरी बंद
By admin | Published: March 30, 2017 5:41 AM