ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेची प्रसूती नॉर्मल झाली. मात्र, मुलाचे डोके मोठे असल्याने त्या महिलेच्या प्रायव्हेट जागेत टाके घालण्यात आले. परंतु, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा तिला दुखू लागल्याने तिची खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कापड अडकल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत कळवा रुग्णालयाने मौन बाळगले आहे.
ठाण्यातील सावरकरनगर भागात राहणारी महिला २९ एप्रिल रोजी कळवा रुग्णालयात दाखल झाली. प्रसूतीनंतर तिला ७ मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला. प्रसूतीच्या वेळेस बाळाचे डोके मोठे असल्याने सदर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाके घालण्यात आले होते. मात्र, त्रास सुरूझाल्याने तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. येथे तिची तपासणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कापड अडकल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुन्हा या महिलेने आपल्या कुटुंबासह कळवा रुग्णालयात धाव घेतली. आता तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.
विशेष म्हणजे प्रसूती झाल्यानंतर रुग्णालयात काचेची पेटी नसल्याने बाळास आइस बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.यासंदर्भात संबंधित महिलेला अॅडमिट करून घेण्यास सांगितले आहे. गुरुवारी तिचे जुने केसपेपर तपासून नेमका काय प्रकार घडलेला आहे, याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर चौकशी करून यात खरोखर दोषी असतील, त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. - डॉ. संध्या खडसे, डीन, कळवा रुग्णालय