बोर्डी : पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडून तापमानात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आर्द्रता आणि तापमानातही घट होणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे कीडरोगांपासून संरक्षण करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव आणि हवामान तज्ज्ञ प्रा. रिझवाना सय्यद यांनी केले आहे.ढगाळ हवामानात भाजीपाला तसेच फळपिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याने योग्य कीटकनाशके तथा बुरशीनाशकांची फवारणी हवामान कोरडे आणि वाऱ्याची गती कमी असताना करावी. काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वारा, पाऊस यामुळे खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार नाही.वांगी, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाला पिकांमध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुड्यांसारख्या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी एकरी २५ ते ३० पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत. वेलवर्गीय भाज्यांना मांडवाचा किंवा काठीचा आधार द्यावा. ढगाळ वातावरणामुळे कोबीवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. यासाठी २.५ ग्रॅम काॅपरऑक्सिक्लोराईड १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहोर संरक्षणासाठी ३ मिली इमिडाक्लोप्रीड तसेच २० ग्रॅम बाविस्टीन पावडर १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सातत्याने बदलत राहणाऱ्या हवामानामुळे पीक संरक्षणासाठी जैविक कीड व रोगनाशकांचा वापर करण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी दिला आहे.तलासरीत दुसऱ्या दिवशीही अवकाळी तलासरी भागात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे भातपिकांबरोबर गवत पावलीही वाया गेली. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली, त्यात पावसाच्या अनियमितपणामुळे आधीच भातपीक वाया गेले. जे काही भात पीक हाताशी आले, त्याची कापणी करून झोडणी करण्याच्या वेळेस पाऊस शुक्रवारपासून सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या भाताचे, गवत पावलीचेही नुकसान झाले. मच्छीमार बांधवांचे कोट्यवधीचे नुकसान डहाणू ते झाई या समुद्रकिनारी गावांमध्ये मच्छीमारी व्यवसाय केला जातो. येथे ऑक्टोबर महिन्यापासून सुक्या मच्छीच्या व्यवसायाला प्रारंभ होतो. यंदा परतीचा पाऊस उशिरापर्यंत पडल्याने मासळी सुकविण्याच्या कामाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. या पावसाने डहाणू खाडी येथे सुकत घातलेले बोंबील, जवळा आणि अन्य माशांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. आगामी काही दिवस तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तविण्यात आल्याने भिजलेली सुकी मच्छी कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन पंचक्रोशीतील गावांमध्ये कुजकट वास येणार आहे.
पालघरला पुढील आठवडा ढगाळ हवामानाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:53 AM