स्टार ११५५
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सध्या ढगाळ व पावसाळी वातावरण असून, त्याचा अस्थमा रुग्णांना अधिकचा धोका असतो. त्यामुळे त्या रुग्णांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातही धूळ, बुरशी तसेच गवताच्या ठिकाणी जाऊ नये, त्याचा त्यांना जास्त त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ॲलर्जी असल्यास अस्थमाचा त्रास आणखी बळावतो. त्याचा परिणाम श्वास घ्यायला होतो. श्वास न घेता आल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. पावसात ढगाळ वातावरण असते, त्यामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यास अस्थमाच्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो. हिवाळ्यातही धुके असल्यास त्यांना त्रास होतो. अतिधूर, धूळ यामुळे एलर्जी होऊ शकते.
रोगप्रतिकारशक्ती कमी
अस्थमा रुग्णांची तुलनेने रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे इतर आजारांची लवकर लागण होऊ शकते. विशेषत: श्वासाचे विकार जडतात, फुफ्फुसांवर परिणाम होतो. त्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्यास अन्य व्याधी निर्माण होऊ शकतात.
--------------
बालकांमध्ये अस्थमा
लहान मुलांना हा त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी शक्यतोवर धूळ, बुरशी या पासून लांब रहावे. पावसाच्या दिवसात घरातील भिंतीवर बुरशी चढून त्याचे बारीक कण अथवा उग्र दर्प, यामुळे श्वासाला त्रास होतो. तसेच ओल्या गवताच्या ठिकाणी देखील उग्र, कुबट वासामुळे श्वासाला त्रास होतो.
-----------
ही घ्या काळजी
ॲलर्जी टाळण्यासाठी बुरशी निर्माण होऊ देऊ नका
घराची प्रचंड स्वच्छता ठेवा
खिडक्या सतत स्वच्छ ठेवा
पडदे सातत्याने धुवा
पंखे, दिवे सतत स्वच्छ करत रहा
धूळ घरात होऊ देऊ नका
-----------------------
अस्थमाचा त्रास लहान मुलांना, मोठ्यांना होत असतो. श्वास घ्यायला त्रास होतो. फुफ्फुसांना हवा पुरवणाऱ्या नळ्यांना बाधा आल्यास ऑक्सिजन कमी पडून शरीराला त्रास होऊ शकतो. त्यासाठी काळजी घेणे गरजेचे असते. स्वतःची स्वच्छता बाळगणे हा एकमेव पर्याय त्याला उपलब्ध असून सतत हात धुणे, नाक स्वच्छ ठेवणे, मास्क वापरणे. बुरशी, धूळ यापासून लांब राहावे. ॲलर्जी वाटल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेचे असते.
- डॉ. कपिल मगरे, बालरोग तज्ज्ञ, डोंबिवली
-----------