ठाणे : क्लस्टरसाठी गेली अनेक वर्षे संघर्ष केला. आता हा प्रकल्प मार्गी लागणार असून केवळ धोकादायक इमारतीच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकास होणार आहे. ठाणे जिल्ह्याशी संबंधित रखडलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री या नात्याने मार्गी लावल्याचे समाधान आहे. क्लस्टर, मेट्रो, सॅटिसमुळे येत्या काळात ठाण्याचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री तथा कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
निवडणूक प्रचाराचा समारोप करताना शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ठाणे जिल्ह्यासोबतच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे क्षमता विस्तार, वाशी येथे खाडीवरील तिसरा पूल अशा राज्यात मार्गी लावलेल्या इतर प्रकल्पांचीही त्यांनी माहिती दिली.
गेल्या पाच वर्षांत आणि त्या आधीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात तुलनेने गेल्या पाच वर्षांत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युतीच्या सरकारने अनेक प्रकल्प राबवले. ठाणे शहराचाही विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला. शहरांतर्गत मेट्रो, कोपरी पूल रु ंदीकरण, पूर्वेला सॅटिस, ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वेस्थानक असे कित्येक प्रकल्प मार्गी लागले.
रस्त्यावरील वाहतूक कमी करण्यासाठी मेट्रो आणि जलवाहतूक प्रकल्प हाती घेतला आहे. क्लस्टर प्रकल्प हा केवळ जुन्या इमारती पाडून नव्या इमारती बांधण्यापुरताच मर्यादित नसून शहराचा नव्याने, सुनियोजित पद्धतीने विकास करण्याची सुवर्णसंधी आहे.काळू नदीवरील धरण प्रकल्पालाही चालना दिली. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला स्वतंत्र धरण मिळणार असल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याचाही दावा त्यांनी केला. ठाणे जिल्ह्यातील १८ आणि पालघरच्या सर्व सहा जागा युती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.एका प्रश्नाला उत्तर देताना बंडखोरांचा युतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अल्पसंख्याकांचा निधी खर्च नाही- दीपाली सय्यद
मुंब्रा परिसरात मुलांचे शिक्षण कमी आणि अमली पदार्थाच्या विळख्यात जास्त आढळले. अनेक ठिकाणी शौचालयांचीही सुविधा नाही. शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय विरोधकांकडून घेतले जाते, असा आरोप यावेळी मुंब्रा-कळवा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांनी केला.