ठाणे : क्लस्टरविरोधात हरकती, सूचना मांडण्याच्या लढाईत आता उशिरा का होईना भाजपानेही उडी घेतली असून, सर्वसामान्यांपाठोपाठ विविध राजकीय मंडळींनीही नागरिकाच्या सुरात सूर मिसळला आहे. सोमवारपर्यंत सुमारे ७० हजारांहून अधिक हरकती पालिकेकडे नोंदवल्या असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.या हरकतींची संख्या वाढली असली तरी पालिकेने सध्या शांततेची भूमिका घेतली आहे. आलेल्या हरकतीत किती ग्राह्यधरण्यासारख्या आहेत, याचा एक अभिप्राय तयार केला जाणार असून, जनतेच्या मागण्या रास्त असतील तर त्यानुसार पुढील धोरण ठरवले जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. यामुळे क्लस्टरचा मार्ग मात्र खडतर झाला आहे.अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून ठाण्यात क्लस्टर लागू झाले. त्यानंतर, पालिकेने अभ्यास अर्बन रेन्युव्हल प्लान तयार केला. यामध्ये ४४ सेक्टर तयार करून त्यावर सूचना, हरकती मागवल्या. परंतु, ही योजना मुळात गावठाण, कोळीवाडे आदी भागांसाठी किंवा अनधिकृत इमारतीत राहणाऱ्यांसाठी कशी घातक आहे, याचा गौप्यस्फोट काँग्रेसने केला. त्यानंतर, गावठाणातील नागरिकांनी हरकती नोंदवण्यास सुरुवात केली. यामध्ये राष्टÑवादीने आणि पुढे जाऊन शिवसेनेनेदेखील उडी घेतली. आता शेवटच्या दिवशी भाजपानेही यात उडी घेतली. त्यामुळे या योजनेविरोधातली धार तीव्र झाली आहे. याहीपेक्षा गावठाण आणि इतर भागांतील रहिवाशांनी विरोध केल्याने तिच्या आराखड्यांबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना येत्या आॅक्टोबर महिन्यात क्लस्टरचा नारळ फोडायचा आहे. परंतु, ज्या पद्धतीने विरोध होत आहे, ते पाहता त्याचा मार्ग खडतर असल्याचे स्पष्ट झाले आहे.वास्तविक पाहता, ठाणे महानगरपालिकेने वर्षानुवर्षे आगरी कोळी व आदिवासीबांधवांच्या जमिनी विकास प्रकल्पासाठी घेऊनही अद्याप त्यांना योग्य तो मोबदला दिलेला नाही. त्याउलट, सरसकट मोठमोठी घरे असलेल्या आगरी कोळीबांधवांना क्लस्टरच्या योजनेनुसार ३२२ स्क्वेअर फुटांची घरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ठाणे शहरातील वातावरण बिघडले असून महापालिकेने जुन्या गावठाणांना क्लस्टरमधून वगळून त्यांना अधिकृत परवानगी देऊन मुंबईप्रमाणे वाढीव चटई निर्देशांकाची मागणी केली आहे.खारेगाव भागात तर क्लस्टरविरोधात हरकती नोंदवण्यासाठी पदाधिकाºयांनी रिक्षा फिरवून आवाहन केले आहे. तसेच यापैकी काही जणांनी अनधिकृत इमारतीमध्ये जाऊन त्यांचे घर आता कमी आकारमानाचे होणार असल्याचा सल्ला देऊन क्लस्टरला विरोध करण्याचे आवाहन केले.दिव्यातील जुने गावठाण क्षेत्र वगळण्याची मागणी
डोंबिवली : ठाणे महापालिकेने दिवा, शीळ, देसाई विभागांबरोबरच कोळीवाडा, जुन्या गावठाणांमध्ये क्लस्टर योजना लागू केली आहे. तसे करताना अनेक तरतुदी स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे आगरी, कोळीबांधव नेस्तनाबूत होणार आहे. आमदार सुभाष भोईर यांनी क्लस्टर योजनेला विरोध केला आहे. दिव्यातील जुन्या गावठाण क्षेत्रातील घरांना या योजनेतून वगळण्याची मागणी त्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. दिवा, शीळ-देसाई विभागातील अनेक गावांचा ठाणे महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. या परिसरात स्थानिक भूमिपुत्रांची अनेक वर्षांपासूनची घरे आहेत. त्यांचे सरासरी क्षेत्रफळ दीड हजार इतके आहे. नागरिकांनी गरजेपोटी घरांचे क्षेत्रफळ वाढवले आहे.या विभागातील दिवा, साबे, दातिवली, म्हातार्डी, बेतवडे, आगासन, देसाई, पडले, खिडकाळी, डायघर, शीळ, खार्डी, फडके, डावले ही गावेही महापालिकेत सामील करण्यात आली.चेंदणी कोळीवाडा कोळी जमातीचा ठाम विरोधठाणे : येथील चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट यांच्या विद्यमाने रविवारी सकाळी दी युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या सभागृहात आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत समाजबांधवांनी समूह विकास (क्लस्टर) योजनेस तीव्र विरोध दर्शवला. या सभेस ३०० समाज बंधूभगिनी उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष अमरेश ठाणेकर या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.सोबत, ट्रस्टचे सर्व कार्यकारिणी सदस्य व ट्रस्टचे विधी सल्लागार अॅड. निशिकांत कोळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी कार्यवाह सुबोध ठाणेकर यांनी या सभेची पार्श्वभूमी विशद केली. विधी सल्लागार निशिकांत कोळी यांनी या योजनेच्या कायदेशीर बाबींचा ऊहापोह केला.यावेळी झालेल्या चर्चेत प्रमोद नाखवा, गिरीश साळगावकर, अनिरु द्ध नाखवा, सुभाष कोळी, अरविंद ठाणेकर, शाहीर रमेश नाखवा, दिलीप नाखवा, सुरेंद्र (बाबू) कोळी, श्रुतिका मोरेकर, हेमलता ठाणेकर आदी मान्यवरांनी मते मांडली.या सर्वांच्या मनोगतातून होऊ घातलेल्या समूह विकास (क्लस्टर) योजनेस तीव्र विरोध नोंदवण्यात आला. शेवटी, सहकार्यवाह गिरीश कोळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमात क्लस्टरची सविस्तर माहिती देणाºया लोकमतमधील विशेष पान उपस्थितांना दाखवून त्यातील माहिती देण्यात आली.