डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील काही रस्ते मंगळवारी रासायनिक प्रदूषणामुळे गुलाबी झाल्याचे पाहायला मिळाले. तर, काहींनी उग्र वासामुळे डोळे चुरचुरण्याच्याही तक्रारी केल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेत तातडीने अहवाल द्यावा, असे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना बुधवारी दिले आहेत.
गुलाबी रस्त्यांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमआयडीसीतील संबंधित ठिकाणी आणि सीईटीपीला बुधवारी भेट दिली. यावेळी त्यांनी या प्रदूषणाच्या समस्येबाबत एमआयडीसी आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी एमआयडीसीकडे बोट दाखवत आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला. तसेच एमआयडीसीच्या अधिकाºयांनीही थातूरमातूर उत्तरे देत यातून आपण नामानिराळे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
मात्र, डॉ. शिंदे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना प्रदूषणाची ही समस्या कायमस्वरूपी सुटावी, यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितले. तर, एमआयडीसीला आपल्या भागातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी जुनी यंत्रणा बदलण्यासाठी लवकरात लवकर प्रक्रिया पार पाडण्यास सांगितले. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील कंपन्यांना अचानक भेट देऊन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, येत्या काही दिवसांत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई हे डोंबिवली एमआयडीसीत भेट देऊन पाहणी करणार असल्याचे शिंदे म्हणाले. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी दिलेल्या सूचनांचे पालन कितपत करतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
रंगाचे कारण जाणून घेण्याचे काम सुरू
रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी एमआयडीसीची ड्रेनेज वाहिनी एका ठिकाणी फुटली होती. तिचे पाणी रस्त्यावर येऊन गुलाबी रंग आला होता का? तसेच अन्य कशामुळे ही घटना घडली असावी, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शंकर वाघमारे यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.