मुंबईत सोमवारी वज्रमूठ सभा पार पडली. या सभेदरम्यान, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमादरम्यान आपल्या शैलीतच यावर रोखठोक उत्तर दिलं. आपण आरोपाला आरोपानं नाही, तर कामानं उत्तर देतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“आपण सर्वकाही सामान्य लोकांसाठी करतोय. मुंबईत आपण सुधारणा करत आहोत. काही लोकं निवडणुका आल्या की मुंबई तोडणार मुंबई तोडणार म्हणतात. कोण तोडणार मुंबई? मुंबई तोडण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही, करता येणार नाही, हे स्वप्नही कोणी पाहू नये. परंतु मुंबईकरांना मुंबई तोडणार सांगून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतायत त्यात ते यशस्वी होणार नाहीत,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईकर आज जाणून आहे, मुंबई बदलतेय. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. देश-विदेशातून तिकडे लोक येतात. संध्याकाळी त्या ठिकाणी जा, काय रोषणाई दिसतेय हे पाहा. आता पोटदुखी सुरू झालीये आणि ती आणखी वाढेल म्हणून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केलाय. त्या ठिकाणी जाऊन मोफत औषध घ्या, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकेचा बाण सोडला.
“मी फार काही राजकीय बोलू इच्छित नाही. त्यांना मी कामानं उत्तर देत असतो,” असं म्हणत त्यांनी मंजूर केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. आरोपांना आरोपांनी उत्तर देणार नाही, कामानं उत्तर देईन. तुम्ही आरोप करा आम्ही डबल काम करत राहू. महाराष्ट्रातील जनतेला आरोप प्रत्यारोप खालच्या दर्जाची भाषा आवडत नाही. ती आपली संस्कृती नाही. एकनाथ शिंदेकडून कधीही अशा आरोपाला उत्तर दिलं जाणार नाही. कामातून उत्तर दिलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री होण्याची स्वप्न“बऱ्याच लोकांना आता मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडायला लागलीयेत. सकाळी एकाला, दुपारी एकाला पडतंय. काही लोकं म्हणतायत दिवसा स्वप्न बघायला लागलेत. ते उठाबसा की उबाठा वाले त्यांना काही सूचतच नाही काय बोलायचं. स्वप्न पाहत राहू दे. आमदार असो किंवा मुख्यमंत्री असो कोणाला बसवायचं आणि कोणाला उतरवायचं हे जनतेच्या हाती असतं,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.