लोकमत न्यूज नेटवर्कवसई : देशात सर्वत्र लॉकडाऊन घोषित असताना कर्जदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने कर्जफेडीला एप्रिलमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा तीन महिने मुदतवाढ दिली आहे, मात्र तरीही राज्याच्या सहकार विभागाने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे तालुक्यातील सहकारी बँका तसेच काही पतसंस्थांनी नेहमीप्रमाणेच आपली कर्जाची वसुली सुरू ठेवली आहे. यामुळे आधीच कोरोनाचे संकट, नोकरीधंदा नाही, पगार नाही, जवळ पैसे नाहीत, अशा वेळी काही बँका व बहुतांश पतसंस्थांचे वसुलीसत्र मात्र सुरू असल्याने अनेक कर्जदार चिंतेत आहेत.
वसई-विरार शहरात ८० हून अधिक सहकारी पतसंस्था तसेच तीन सहकारी बँका असून अनेकांनी या बँका व पतसंस्थांमधून कर्ज घेऊन छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू केले आहेत. मात्र अचानकपणे ओढवलेल्या कोरोना संकट व टाळेबंदीमुळे नोकरी व उद्योगधंदे बंद पडले आहेत.
साहजिकच या कर्जदारांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे. त्यामुळे आता ही कर्जे व त्याचे हप्ते सध्या तरी फेडायचे कसे, असा मोठा प्रश्न या कर्जदारांना पडला आहेत. त्यामुळे सरकारने रिझर्व बँकेच्या धोरणानुसार आदेश काढून कर्जदारांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.