ठाणे : शिक्षकांनी बदलत्या शिक्षणपद्धतीप्रमाणे आपणामध्ये बदल घडवणे गरजेचे आहे. नवीन शिक्षण पद्धती ही काळाची गरज आहे. शालेय शिक्षकांप्रमाणे खाजगी कोचिंग क्लासेसचा शिक्षकसुद्धा उच्च शिक्षित असून तो अहोरात्र मेहनत घेऊन समाज घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे सरकारी शाळेतील शिक्षकांप्रमाणे खाजगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांचा सन्मान व्हावा, असे प्रतिप्रादन लेखक व साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आयोजित केलेेल्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळ्याप्रसंगी केले.
कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने सायबा हॉल येथे रविवारी कोचिंग क्लासेसमधील शिक्षकांना प्रोत्साहन व सन्मान करण्यासाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. रोहित पांडे, एज्युकेशनल कन्सल्टंट समीर वकारिया होते.
गेले वर्षभर आम्ही क्लासेस संचालकांच्या समस्या पत्राद्वारे मुख्यमंत्री, पालकमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडून सर्व नियमांचे पालन करून क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करीत आहोत. परंतु, शासन दरबारी त्याची दखल घेतली जात नाही, अशी खंत उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली.
६० शिक्षकांचा सन्मान
या सोहळ्यात क्लासेसच्या ६० शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी क्लासेस संचालक संघटनेचे खजिनदार सुनील सोनार, सह कार्याध्यक्ष रवींद्र प्रजापती, कायदे विषयक सल्लागार शैलेश सपकाळ, राज्य कार्यकारिणी सदस्य अन्वर सय्यद, संतोष गोसावी, आनंदा जाधव उपस्थित होते.
---------------