सदानंद नाईक / उल्हासनगरमहापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेनंतर शिवसेना, भाजपा, साईसह इतर पक्षांच्या नेत्यांनी रात्री कार्यकर्त्यांसह ढाब्यावर सहभोजनाचा आनंद लुटला. तसेच प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निकालाचा अंदाज घेतला. अनेक जणांनी मोबाइल सहकाऱ्यांकडे ठेवून बोलणे टाळले. काही नेत्यांनी बुधवारी सकाळी मंदिरात जाऊन देवाकडे विजयाचे साकडे घातले.उल्हासनगरात शिवसेनेचे प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. गेल्या एका महिन्याच्या धावपळीने थकवा जाणवला होता. तरीही, त्यांनी मतदान प्रक्रिया संपताच पक्ष पदाधिकारी व शिवसैनिकांसह सहभोजनाचा लाभ उठवला. नेहमीप्रमाणे मंदिरात जाऊन देवाकडे शिवसेनेची सत्ता येऊ दे. असे साकडे घातले. तसेच नातेवाइकांना फोन करून त्यांची विचारपूस केल्याचे ते म्हणाले. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी मतदान प्रक्रिया संपताच प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर, कार्यकर्त्यांसह भोजन घेऊन उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, पुन्हा निकालाबाबत कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, बुधवारी कुठेही धावपळ व फोनाफोनी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी टीमच्या सर्व उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांसोबत मतदान प्रक्रियेनंतर चर्चा केली. तसेच त्यांचे म्हणणे ऐकल्यावर कलानी-महालवर सोबत जेवण घेतले. उशिरा उठल्यानंतर वडील पप्पू कलानी यांच्याशी बोललो. पुन्हा कलानीराज येणार असल्याचे ते म्हणाले. साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी मतदान प्रक्रियेनंतर उमेदवार व पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन घरी विश्रांती घेतली. सकाळी कार्यालयात जाऊन मतदान व निकालाचा कल कसा असू शकतो, याबाबत चर्चा केली. मात्र, बाहेर जाणे टाळले. तसेच परदेशी असलेल्या मुलीशी गप्पा मारून नातवाशी बोललो. कधी नव्हे आज शांत वाटत असून निकालाची चिंता नाही. सत्तेची चावी साई पक्षाकडे राहील, असे ते म्हणाले.
नेत्यांचे कार्यकर्त्यांसह ढाब्यावर सहभोजन
By admin | Published: February 23, 2017 5:55 AM