मीरारोड - भाईंदर मधील शासनाच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाच्या शवागारातील २१ पैकी तब्बल १२ शवपेट्या ह्या नादुरुस्त असून दुसरीकडे महापालिकेच्या मीरारोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील शवागार २०१९ पासून बंद केल्याने तेथील १६ शवपेट्या धूळखात पडलेल्या आहेत. त्यामुळे मृतदेह ठेवण्यास शवपेट्यांची प्रचंड उणीव भासत असून अनेकवेळा मृतदेह उघड्यावरच ठेवण्याची पाळी येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
भाईंदरच्या शासकीय रुग्णालयात असलेल्या शवागारात २१ वातानुकूलित शवपेट्या आहेत. परंतु त्यातील ९ शवपेट्या ह्या कायम स्वरूपी निकामी करण्यात आल्याने केवळ १२ शवपेट्याच उपलब्ध होत्या . त्यातही आणखी ३ शवपेट्या ह्या वातानुकूलित यंत्रणा बिघडल्याने अधून मधून बंदच असतात. गेल्या रविवारी सदर ३ शवपेट्या पुन्हा खराब झाल्याने कर्मचाऱ्यांनी शासनाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून त्याची तक्रार केली. त्यामुळे केवळ ९ शवपेट्याच कार्यरत आहेत . परंतु गुरुवार उजाडला तरी दुरुस्तीसाठी कोणी आले नाही.
सदर ९ पैकी ८ शवपेट्यांमध्ये बेवारस मृतदेह ठेवण्यात आले असून शवविच्छेदनसाठी आलेला १ मृतदेह ठेवलेला होता. त्यामुळे शवविच्छेदनचा आणखी एक मृतदेह शवागारात बाहेरच ठेवलेला होता. मंगळवारी रात्री उत्तन येथील एक मृतदेह शवागारमध्ये ठेवण्यासाठी आला असता शवपेट्या रिकाम्याच नसल्याने अखेर तो मृतदेह बर्फ आणून त्यात ठेवण्यात आला.
दरम्यान मीरा भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात महापालिकेने शवागार सुरु केले होते. त्याठिकाणी १६ वातानुकूलित शवपेट्या बसवण्यात आल्या. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाच्या अदूरदर्शी उदासीन कारभारा मुळे ऑक्टोबर २०१९ पासून हे शवागारच बंद करण्यात आले. तेव्हापासून लाखो रुपये खर्चून बसवलेल्या शवपेट्या धूळखात पडलेल्या आहेत.
वास्तविक ह्या धूळखात पडलेल्या शवपेट्या भाईंदर येथील सरकारी शवागारात वापरात आणता आल्या असत्या किंवा मीरारोड येथील पालिका रुग्णालयातले शवागार पुन्हा सुरु करणे आवश्यक होते. कारण शहरात अपघाती मृत्यू, आकस्मिक मृत्यूंचे प्रमाण खूपच वाढते असून बेवारस मृतदेह सुद्धा ठराविक काळा साठी ठेवावे लागतात. शिवाय शहरातील एखाद्या नागरिकाच्या मृत्यू नंतर त्यांचे नातलग आदी येण्यास उशीर होणार असल्यास मृतदेह ठेवण्यासाठी शवागाराची गरज लागते.
शासन आणि प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे शवपेट्या नादुरुस्त असून सुद्धा नव्याने शवपेट्या बसवणे, आहेत त्या दुरुस्त करणे सारखी कामे देखील होत नाहीत या बद्दल टीका होत आहे. जिवंतपणी चांगले उपचार व सुविधा मिळत नसताना मृत्यूनंतर देखील मृतदेह ठेवण्यासाठी शासन व महापालिके कडून वातानुकूलित शवपेट्या देखील उपलब्ध करून दिल्या जात नसल्या बद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.