मीरा - भाईंदर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची मुदत वास्तविक २०२१-२२ सालात संपुष्टात आली होती. परंतु अंतर्गत मतभेद आणि त्यातून एकमेकां विरुद्ध तक्रारी आदी विविध कारणांनी हि पतसंस्था वादग्रस्त ठरू लागली. वास्तविक पूर्वी ह्या पतसंस्थेवर कर्मचाऱ्यांच्या सहकार पॅनलचे दिवंगत सहायक आयुक्त गोविंद परब यांच्या नेतृत्वाखाली अबाधित वर्चस्व होते.
काही राजकारणी यांनी पतसंस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यांनी त्यांना तोंडावर आपटले होते. त्यामुळे जुन्या पतसंस्थेला शह देण्यासाठी नवीन पतसंस्था काढली गेली. इतकेच काय तर जुन्या पतसंस्थेचे पालिकेतील कार्यालय रिकामे करण्याचा तगादा लावला गेला.
मुदत संपल्याने उपनिबंधक कार्यालयाकडून विद्यमान संचालक मंडळाने मुदतवाढ घेतली होती. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने पतपेढीचा निवडणुक कार्यक्रम मार्च २०२४ मध्ये जाहीर केला मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिते मुळे पतसंस्थेची निवडणूक बारगळली.
अखेर १ जुलै रोजी झाली. सहकार पॅनल मधील फूट आणि नेतृत्वाचा अभाव तर दुसरीकडे सहयोग पॅनलने शहरातील प्रताप सरनाईक आणि गीता जैन हे दोन्ही आमदार, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित सह दोन माजी आमदार व त्यांच्या राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवला होता. त्यामुळे सहयोग पॅनलचे पारडे जड झाले होते. परंतु मोठे नेत्यांचे राजकीय पाठबळ नसताना देखील सहकार पॅनलच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी चांगली लढत दिली. सहयोग पॅनलने १९ पैकी १२ जागा जिंकल्या तर सहकार पॅनलने ७ जागा जिंकल्या.
सहयोग पॅनल मधून कैलास म्हात्रे, उल्हास आंग्रे, कैलास शेवंते, महेंद्र गावंड, दत्तात्रेय वरकुटे, रवींद्र सानप, हेमंत हंबीर, जगदीश भोईर, मनोज भोईर, मधुकर भोईर, शर्मिला गायकर, विनया मिरांडा हे निवडून आले. तर सहकार पॅनल मधून किरण पाटील, प्रकाश बोराडे , देवानंद पाटील, दत्ता राख, संगीत गोतारने, परशुराम सिंगाराम, सुजित घोणे असे ७ सदस्य निवडून आले. ५ वर्षांसाठी हे संचालक मंडळ असणार आहे. श्रमजीवी संघटनेचे सुलतान पटेल यांनी सहयोग पॅनलच्या विजया बद्दल कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.