ठाणे : ठाणे महानगरपालिकेची ७५ हजार लिटर पिण्याच्या पाण्याची रीनोटँक टाकी फुटल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या वागळे इस्टेट रोड क्रमांक ३३,रुपादेवी देवी टेकडी, सुमारास समोर आली. या दुर्घटनेत २१ घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ६ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर ७५ वर्षीय तानुबाई श्रवण मुठे या आजीबाई जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
वागळे इस्टेट, रोड क्रमांक ३३,रुपादेवी देवी टेकडी, रूपादेवी पाडा,महालक्ष्मी मंदिर जवळ, ख्रिश्चन कब्रिस्तान समोर असलेली २००९ साली बांधण्यात आलेली ऑस्ट्रेलियन बनावटीची ठाणे महानगरपालिकेची ७५ हजार लिटर पिण्याच्या पाण्याची (रीनोटँक) टाकी सकाळी फुटून पाणी जवळच असलेल्या झोपडपट्टीतील घरावरती मोठया प्रेशरने गेल्यामुळे त्या झोपडपट्टीतील घरांच्या भिंती व छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली.
त्यानुसार घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, NDRF चे अधिकारी व जवान, वागळे पोलीस कर्मचारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा विभाग, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती) यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवकांनी धाव घेतली . या दुर्घटनेत तानुबाई मुठे या आजीबाईंचा उजव्या पायासह उजव्या हाताला व कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने लोकमान्य नगर येथील लोकमान्य हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल केले आहे. तर घटनास्थळी ६-घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व इतर १५-घरांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.