मीरारोड, दि. 16- भाईंदरच्या उत्तन डोंगरी भागात मुलांना घेऊन सहलीला जाणाऱ्या खासगी बसवर झाड कोसळलं आहे. मुलांना सहलीला घेऊन निघालेली शाळा ही ठाण्यातील असल्याची माहिती मिळते आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. पण या घटनेमुळे बसमधील मुलं घाबरली होती. शाळेच्या मुलांना घेऊन तीन खासगी बस एस्सेलवर्डला सहलीला निघाल्या होत्या तेव्हा हा अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी सुमारे 10 ही घटना घडली आहे. ठाण्यातील रायला देवी तलावजवळ नवदया इंग्लिश स्कूलच्या या बसेस होत्या.
ज्या बसवर झाड पडलं त्या बसमध्ये एकुण 54 मुलं होती. बसवर झाड पडल्यावर इतर दोन बसमधून मुलं एस्सेलवर्डसाठी रवाना झाली आहेत. स्थानिक ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजूला केलं आहे. आता रस्ता खुला झाला आहे.
उत्तन पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीण साळुंके यांनी सांगितले की, बस गोराईच्या दिशेने जात असताना डोंगरी - तलावली जवळ मोठे झाड पडले. बसच्या पुढील भागात झाड पडून बसच्या काचा फुटल्या पण कोणीही जखमी नाही. दुपारी बारा वाजेच्या सुमारास झाड बाजूला करण्यात आल्यावर हळूहळू वाहतूक सुरू झाली आहे. शनिवार असल्याने गोराई, एस्सेलवर्ल्ड कडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असतेदोन तास रस्ता बंद झाल्याने वाहनांच्या लांब रांगा दोन्ही दिशेला होत्या.