लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याणमधील एका १२ वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून ६५० ग्रॅम केसांचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. पोटातील आतड्यांवर पूर्णपणे ताबा घेतलेल्या केसांच्या गोळ्याला दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला. कल्याण पूर्वेतील एका खाजगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच केस खाण्याची सवय लागली. या सवयीला ट्रायकोफेगिया असे म्हणतात. या मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सोडण्यास खूप प्रयत्न केला; परंतु ती सवय सुटली नाही. गेल्या आठवड्यात मुलीचे पोट दुखायला लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिचे वजन फक्त २० किलो होते. सीटी स्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस दिसून आले व गेल्या दोन महिन्यांपासून तिला जेवण जात नव्हते.
पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कोपिक पद्धतीचा अवलंब केला जातो; परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की, तो काढताना केस लॅप्रोस्कोपिक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती, म्हणून ओपन सर्जरीचा मार्ग निवडला व केसांचा गोळा काढण्यात यश मिळाले. शस्त्रक्रियेनंतर मुलीला जेवताना पाहून तिच्या पालकांना खूप आनंद झाला. या केसांच्या गोळ्याला वैद्यकीय भाषेत ट्रायकोबीझोअर म्हणतात. या दुर्मीळ प्रकारात केस खाल्ल्यामुळे असे गोळे तयार होतात, अशी माहिती लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. रोहित परयानी यांनी दिली. त्यामुळे आपल्या पाल्याला अशी सवय असेल तर वेळीच त्यावर उपचार होणे गरजेचे आहे; अन्यथा व्यक्ती बेशुद्ध पडू शकते, असे त्यांनी सांगितले.
............