ठाणे : जुन्या पेन्शनसोबतच कंत्राटी, बदली व योजना कामगारांना समान काम समान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे तत्काळ भरा, या भरतीत आरोग्य विभागास अग्रक्रम द्याया आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरती पूर्ववत सुरु ठेवावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाशर्त करून करोनात मृत झालेल्यांच्या वारसांना वयात सूट द्यावी, केंद्रासमान वाहतूक व शैक्षणिक भत्ते मंजूर करावेत आदी मागण्यांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचार्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली आज दुपारी एकत्र येत निदर्शने केली.
महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी या आधीही लाेकशाही मार्गाने अनेक आंदाेलने केली. ५४ दिवसांच्या बेमुदत संपानंतर ४४ वर्षांनी ७ दिवसांचा बेमुदत संप आदी धरणे आंदाेलने करूनही कर्मचार्यांच्या मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप संघटनेच्या अध्यक्षा प्राची चाचड, सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी केला.
शासनाच्या या दुर्लक्षितपणामुळे संतापलेल्या या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदाेलन छेडले. याव्दारे प्रमुख मागण्यांस सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करा, पदे निरसित करू नयेत, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवाविषयक समस्या सोडवाव्यात. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे रोखलेले पदोन्नती सुरु करावी आदी मागण्या यावेळी करून कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्याचे निवेदन महसूल तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांना दिले.