लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्टमध्ये सोमवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान चार ते पाच प्रवाशी अडकल्यामुळे चांगलीच धांदल उडाली. काही कालावधीनंतर त्यांची त्यातून सुटका झाली. मात्र घडलेल्या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील कामांसाठी नागरिकांची सारखी ये-जा सुरू असते. त्यात सोमवार असल्यामुळे कार्यालयात नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे सतत सुरू असलेल्या लिफ्टमध्ये बिघाड होऊन ती अचानक अडकली. त्यात असलेल्या पाच जणांनी ही लिफ्ट वाजवायला सुरूवात केली. सुदैवाने तेथून ये-जा करीत असलेल्या कार्यालयीन सेवकाच्या कानावर हा आवाज गेला आणि त्याने त्यातील अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे काही वेळातच या नागरिकांची सुटका झाली, पण त्यांनी प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारासमोरील लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांची वेळेत सुटका झाली. पण काही वेळेआधी जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील याच लिफ्टचा वापर केला होता.
या घटनेची दुसरी बाजू अशी की, सुस्थितीत असलेल्या या लिफ्टमध्ये असलेल्यांनी चुकीचे बटन दाबल्यामुळे ती मध्येच अडकल्याचा अंदाज कर्मचाऱ्यांसह तेथील उपस्थितांपैकी काही जणांकडून व्यक्त केला जात आहे. या आधीही या कार्यालयाच्या लिफ्टमध्ये नागरिक अडकल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे या लिफ्टची निगा राखण्याची, काळजी घेण्याची अपेक्षा कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसह अधिकारी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.