डोंबिवली : रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या तरुणीला लोकलची धडक बसल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण रेल्वेस्थानकात बुधवारी सकाळी ९.४५ वाजता घडली. अंतिमादेवी दुबे (२८, रा. अशोका इमारत, लोकउद्यानजवळ, सांगळेवाडी, कल्याण पश्चिम) असे तिचे नाव आहे. ती पूर्वेकडील साकेत महाविद्यालयात शिकत असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी. शार्दुल यांनी दिली.अंतिमादेवी सकाळी ९.४५ वाजता कल्याण स्थानकात फलाट क्रमांक १ वरील मुंबई दिशेकडील बाजूला रेल्वेरूळ ओलांडत होती. यावेळी सीएसएमटी येथून कल्याण येथे येणाºया लोकलची तिला धडक बसली. या घटनेची माहिती कल्याण स्थानक प्रबंधकांकडून मिळाल्यानंतर तिला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबीयांनी तिची ओळख पटवली असून, शवविच्छेदन अहवालाची कार्यवाही सुरू असल्याचे ते म्हणाले.कल्याण रेल्वेस्थानकात रुग्णवाहिका नसल्याने अपघात घडल्यानंतर तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेताना पोलिसांची गैरसोय होते. बुधवारच्या घटनेतही अंतिमादेवी हिला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची चर्चा स्थानक परिसरात सुरू होती. पोलीस यंत्रणेने त्या वृत्ताला दुजोरा दिला नसला, तरी रुग्णवाहिका नसल्याने तिला स्ट्रेचरवरूनच रुग्णालयात नेल्याचे सांगितले.>लोकलची धडक बसल्यानंतर घटनास्थळीच अंतिमादेवीचा मृत्यू झाला. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला, असे म्हणणे सयुक्तिक होणार नाही, असे पोलीस म्हणाले. स्थानक प्रबंधकांच्या माहितीनुसार तरुणीच्या डोक्याला दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
रेल्वेरुळ ओलांडताना लोकलच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 1:22 AM