ठाणे : ठाणे शहरातून विविध संस्थांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात देत असतानाच ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना या दोन महाविद्यालयांनी मु.पो. भेंडवडे, ता. हातकंणगले, जि. कोल्हापूर हे गाव दत्तक घेतले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, एनएसएस, एनसीसी, सेल्फ डिफेन्सचे विद्यार्थी मदतीसाठी रवाना झाले आहेत. १५ आॅगस्टला या गावात मदत पोहोचवून एक अनोख्याप्रकारे रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तू असा जवळपास २० टनांचा माल घेऊन ही मंडळी कोल्हापूरकडे रवाना होत आहेत.शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय आणि ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत करण्याचे ठरवले आहे. गावातील जवळपास ६५० घरांना अजून मदत पोहचलेली नाही. महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी यांनी सर्वांना अवाहन केले की, पूरग्रस्त माणसांना तांदूळ, साखर, मीठ, पीठ, बिस्कीट, रेडी टू कुक पदार्थ, चादरी, कपडे तसेच शैक्षणकि साहित्य अशा पद्धतीची मदत करावी. हे आवाहन स्वयंसेवकानी तर केलेच पण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरु वात ही स्वत:पासून करावी हे राष्ट्रीय सेवा योजनेने शिकवले. त्यामुळे स्वत: स्वयंसेवक, प्राध्यापक, कर्मचारी असे सर्व मिळून जवळपास ६० जणांचा ताफा गुरूवारी भेंडवडे गावाला पोहोचत आहे, असे प्रा. प्रदीप ढवळ यांनी लोकमतला सांगितले. ही मदत गावातील प्रत्येक घरांत पोहोचविली जाणार आहे.स्वयंसेवकच बनणार भाऊ अन बहीणरक्षाबंधनासाठी आपले भाऊ बहीण तर जवळ आहेतच, पण त्या पूरग्रस्त माणसांना ठाऊकही नसेल की या पुरात आपले भाऊ-बहीण कुठे असतील आणि कोणत्या परिस्थितीमध्ये असतील. अशा या भावा-बहिणींसाठी स्वयंसेवक त्यांचे भाऊ-बहीण बनून त्यांना साथ देणार आहेत. दोन्ही महाविद्यालयांचा परिवार सज्ज झाला आहे. त्यांचे घर पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी आणि मदतीचा हात व प्रेमाची साथ देण्यासाठी. या गावाला एका दिवसापुरती मदत न देता ज्या ज्या वेळी गरज लागेल त्या त्या वेळी ती पुरविली जाणार असल्याचे प्रा. ढवळ यांनी सांगितले.
महाविद्यालयांनी दत्तक घेतले पूरग्रस्त गाव, आनंद विश्व गुरुकुल, ज्ञानसाधनाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 2:25 AM