शाम धुमाळ
कसारा - सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कसारा घाट व कसारा रेल्वे स्टेशन म्हणजे निसर्गाने नटलेला परिसर अनेक पर्यटक हे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पर्यटकांना कसारा रेल्वे घाटातील प्रेक्षणीय स्थळांची कायम भुरळ पडत असते. परंतु वर्षभर आहे त्याच सुविधा प्रवाशांच्या माथी रेटून नेणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाकडून मार्च एंडिंग दरम्यान रेल्वेच्या महाव्यवस्थापकाकडून होत असलेल्या सर्वेसाठी मुंबई ते भुसावळ दरम्यान सर्वच रेल्वे स्थानकावर सुशोभीकरण केले जात आहे.
जानेवारी महिन्यापासून मध्य रेल्वे प्रशासनाने कसारा रेल्वे स्थानक व कसारा रेल्वे घाट परिसरात सुशोभिकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या कसारा रेल्वे स्थानकावर अनेक सुविधांचा अभाव आहे. प्रवासी विशेषतः महिला व वृद्ध प्रवाशाच्या सुरक्षेसाठी कुठलीही सुविधा नाही. लोकलच्या फ्लॅट फॉर्मवर रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलचे कर्मचारी, महिला कमांडो गस्तीला नसतात. त्यातच कसारा रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या अनेक रेल्वे एक्स्प्रेसचा थांबा बंद केल्याने रेल्वे प्रवासी व प्रवासी संघटना नाराज आहेत.
रेल्वेचे महाव्यवस्थापक हे कसारा व कसारा घाट परिसराची पाहणी करणार असल्याने रंगरंगटी केली जात आहे असे बोलले जात आहे. दरम्यान कसारा रेल्वे घाटातील दरोडा व महिला प्रवाशावरील अतिप्रसंग असो वा छोट्या मोठ्या चोऱ्या असोत याकडे रेल्वे प्रशासनाने अद्याप दुर्लक्षच केल्याचे दिसते. पुष्पक एकसप्रेस मधील घटनेनंतर देखील कसारा रेल्वे घाटात लांब पल्ल्याच्या गाड्याचा थांबा असलेल्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा कर्मचारी तैनात नाहीत. किंबहुना या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी कुठलीही व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केलेली नाही.
दरम्यान कसारा रेल्वे स्थानकासह कसारा रेल्वे घाट, उबरमाळी स्टेशन, खर्डी, तानशेत, आटगाव रेल्वे स्थानकावर् सुरक्षा कर्मचाऱ्यांची गस्त गरजेची असताना तीही केली जात नाही. दरम्यान असुविधा व असुरक्षितात या विषयी प्रत्यक्षात एकाही राजकीय नेत्याने याची दखल घेतली नसल्याने प्रवाशाना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावे लागत आहे. या स्थानकावर सद्या स्थितीत मोजकाच गाड्या थांबतात. एकेकाळी जंक्शन असलेल्या इगतपुरी रेल्वे स्थानकाचे नाव नामेषश होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
विशेष म्हणजे मुंबईला जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे तिकीट घ्यावे लागते. केवळ दिखावा म्हणून रेल्वे स्थानकावर विविध रंग रेखाटण्याचा काम कलाकार करत आहे. त्यामुळे कसारा रेल्वे घाट,कसारा रेल्वे स्थानकाच देखील रूप पालटलं आहे. मात्र प्रत्यक्षात फायदा काहीच नाही.