डोंबिवली : स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक शाळेत माजी विद्यार्थी संघातर्फे शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा शनिवारी घेण्यात आली. या स्पर्धेत गोपाळनगर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांना प्रथम, सरला खरात व पुष्पा नाठे यांना द्वितीय, तर तृतीय क्रमांक मोनिका पाटील यांच्यासह एका शिक्षिकेला विभागून देण्यात आला.
पारितोषिक मिळालेल्या शिक्षकांना माजी विद्यार्थी संघाचे पप्पू तुळसकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ऑनलाइन शाळा शाप की वरदान, माझे आवडते शिक्षक, माझे आदर्श व्यक्तिमत्त्व आदी विषय देण्यात आले होते. शिक्षकांप्रति माजी विद्यार्थ्यांचे असलेले प्रेम व आदर पाहून भावी पिढीतील माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांना आदर वाटला. शिक्षक दिनाच्या समारंभासाठी अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाच्या मार्गदर्शिका माजी कलाशिक्षिका कुमुद डोके, अतिथी म्हणून विद्या कुलकर्णी, भावना राठोड आदी उपस्थित होत्या. स्वामी विवेकानंद शाळेच्या १९ शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार केला. संघाचे माजी अध्यक्ष संजोग बेलाटीकर यांनी या उपक्रमाचे आयाेजन केले हाेते. सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी व संघाच्या सेक्रेटरी ॲड. अदिती टण्णू यांनी केले. गौरी भिवंडीकर यांनी आभार मानले. संस्थेचे कार्यवाह डॉ. दीपक कुलकर्णी यांनी विजेत्यांचे आभार मानले.