ठाणे : ठाण्यातील दीपाली (नाव बदलले आहे) चा १९९८ साली पुण्यातील तरुणाशी विवाह झाला. लग्नानंतर काही महिन्यांतच ती गरोदर राहिली. गरोदरपणामध्ये केलेल्या तपासणीत ती एचआयव्हीबाधित असल्याचे समजले आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. आयुष्य संपल्यासारखे तिला वाटले. डॉक्टरांनीही ती काही दिवसांचीच पाहुणी असल्याचे सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी दिलेले पाठबळ आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळे दीपाली २० वर्षांपासून या आजाराशी झुंज देत आहे. मुलीसोबत आपण आयुष्य ‘एन्जॉय’ करत आहोत, असे दीपाली आता आनंदाने सांगते.पुण्यातील एका चांगल्या कंपनीत नोकरीला असलेल्या एका तरुणाशी ठाण्यातील दीपालीचा विवाह झाला होता. लग्नाच्या काही महिन्यांनी ती गरोदर राहिली. सातव्या महिन्यात एचआयव्हीची तपासणी केली असता ती एचआयव्हीबाधित असल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान, दीपालीने मुलीला जन्म दिला. मुलीचा चेहरा पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आले. आपण स्वत: आजारी असताना मुलीला कोण सांभाळणार, असा प्रश्न तिच्यासमोर होता. पण, आईवडिलांनी आणि बहिणींनी दीपालीसह तिच्या मुलीची काळजी घेतली. यादरम्यान पतीचे निधन झाले. दीपालीचा संसार फक्त १८ महिन्यांचा ठरला. त्यानंतर, ती पुन्हा ठाण्यात स्थायिक झाली. सुरुवातीला तिने आयुर्वेदिक औषधे घेण्यास सुरुवात केली. त्यातून पायाला फोड झाला. जखम वाढून पायाला अर्धा किलोचा गोळा तयार झाला. त्यावेळी सरकारी रुग्णालयात तपासणी केल्यावर ती काही दिवसांची पाहुणी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पायाच्या जखमेवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर, एका मित्राच्या मदतीने ती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील एआरटी केंद्रात पोहोचली.>पतीही होता बाधितदीपालीच्या पतीलाही हा घातक आजार होता. मात्र, लग्नाच्यावेळी दीपालीला ते माहीत नव्हते. दीपालीचा हा आजार समजल्यानंतर आईवडील, बहिणींनी तिला धीर दिला. सात महिन्यांची गर्भवती असल्याने गर्भपात करणेही शक्य नव्हते. त्यामुळे बाळाला जन्म देण्याचा सल्ला तिच्या कुटुंबीयांनी दिला. उपचार नियमित सुरू ठेवल्याने आजारी असतानाही दीपाली मुलीचा अभ्यास घेऊ शकली. त्यामुळे तिला ८२ टक्के गुण मिळाले आणि दीपालीचा आनंद गगनात मावेनासा झाला. एआरटी केंद्रावर मागील १० वर्षांपासून औषधोपचार घेत असल्याने दीपालीचे आयुष्य बऱ्यापैकी सुरळीत झाले आहे. एआरटी केंद्रातील डॉक्टर, कर्मचाºयांचे आभार मानावे, तेवढे कमी आहेत, असे दीपाली पाणावलेल्या डोळ्यांनी सांगते.
इच्छाशक्तीच्या जोरावर एचआयव्हीशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:38 AM