- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा कारभार आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. याचे वृत्त ऑनलाईन लोकमतमध्ये 23 जानेवारीला प्रसिद्ध झाले होते.त्यात येत्या महिनाभरात आयुकांची उचलबांगडी होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. अखेर ते खरे ठरले.
आयुक्तांनी विविध करांच्या वसुलीला अद्याप ठोसपणे केलेली नाही. गतवर्षीची वसुली व यंदाची वसुली यात मोठी तफावत असुन यंदा कर वसुलीपेक्षा इतर कामांत आयुक्त व्यस्त असल्याचा आरोप मेहता यांनी केला आहे. आयुक्तांनी बार व लॉजिंग-बोर्डींगवर केलेली तोडक कारवाई ठोसपणे केली नाही. त्यामुळे तोडण्यात आलेले बार व लॉजिंग-बोर्डींग पुन्हा जोमाने सुरु झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात एकही नवीन विकास काम केले नसल्याचा दावा मेहता यांनी केला आहे. त्यांच्याकडुन ज्या विकासाच्या गप्पा ठोकल्या जात आहेत. त्या तत्कालिन आयुक्तांच्या कार्यकाळात झालेल्या असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे. एकीकडे बांधकाम परवानग्या देताना त्यातील सर्व त्रुटी दुर करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या जातात. तर दुसरीकडे आयुक्त नगरविकास विभागातच ठाण मांडून बांधकाम परवानग्या देत असल्याचा आरोप मेहता यांनी केला आहे. आठवड्यातून अनेकदा ते आपल्या दालनात अनुपस्थित राहतात. त्यांनी त्याची कल्पना महापौरांना देणे अपेक्षित असतानाही ते त्याला छेद देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विकासाच्या मुद्यावर ते अनेकदा असहमती दर्शवित असल्यानेच त्यांच्या एकतर्फी कारभारात पदसिद्ध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची आवश्यकताच नसल्याने दालनांना टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मेहता यांच्याकडुन सांगण्यात आले. त्याची कल्पना थेट मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी मेहता यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्यापुढे आयुक्तांचा असहकार कथन केला. त्यात ते यशस्वी झाल्याने आयुक्तांची आजच उचलबांगडी करून त्यांची बदली नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर केली. त्यांच्या जागी मंत्रालयातील गृहनिर्माण विभागाचे संयुक्त सचिव केशव पवार यांची वर्णी लावण्यात आली आहे. पवार हे 2006 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. यापूर्वी मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांना संपर्क साधुन त्यांनाआयुक्तांच्या एकतर्फी कारभाराची तक्रार केली होती. डॉ. गीते आयुक्त पदावर येण्यापूर्वी राज्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक होते. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे मेहता यांच्याकडे काही व्यवहार थकीत असल्याने त्यावर करडी नजर ठेवण्यासाठीच डॉ. गीते यांना आयुक्तपदी विराजमान करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी सुरू होती. डॉ. गीते यांच्यापुर्वी देखील पंकजा यांच्याच मर्जीतील अच्युत हांगे यांना नागपूर पालिकेतून अवघ्या सहा महिन्यांत मीरा-भाईंदर पालिकेच्या आयुक्त पदावर आणले गेले. यांच्याशीदेखील मेहता यांचे सूत न जुळल्याने त्यांची बदली घडवुन आणण्यात आली.