- राजू काळे
भार्इंदर - भाजपाचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांनी भार्इंदर पुर्वेकडील मौजे गोडदेव येथील दवाखाना व प्रसुतीगृह या राखीव भूखंडावर बांधलेल्या रुग्णालयाला वाचविण्यासाठी थेट आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव आजच्या महासभेत सादर केला जाणार आहे. या प्रस्तावावर सत्ताधारी भाजपाकडुन बहुमताच्या जोरावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सुत्राकडुन सांगितले जात आहे.
पालिकेच्या शहर विकास योजनेनुसार मौजे गोडदेव येथील सर्व्हे क्रमांक २४ (३३८) पै ३, २६(३३४) पै ४ व २७ (३३१) या जागेवर दवाखाना व प्रसुतीगृहाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मात्र या आरक्षणाला बगल देत मेहता यांनी त्या जागेवर सध्या दुमजली रुग्णालय बांधले असुन पालिकेने आणखी एक मजला वाढविण्यासाठी परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालय बांधण्यापुर्वी मुळ आरक्षणात बदल होणे अपेक्षित असताना तसे करण्यात आले नाही. तसेच प्रशासनानेही एका नेत्याला वेगळा व दुसय््राा नेत्याला वेगळा न्याय, असा दुजाभाव न करता मेहता यांच्या प्रस्तावित रुग्णालयाकडे दुर्लक्ष करुन त्याला बांधकाम परवानगी दिली. बांधकाम परवानगीपोटी आरक्षणाची सुमारे ४ हजार ३३० चौरस फूट जागा पालिकेला दवाखान्यासाठी देण्याचे निश्चित करण्यात आले. हि जागा अद्याप पालिकेला न मिळाल्याने तसेच मुळ आरक्षणाला तिलांजली वाहुन मेहता यांनी त्यावर रुग्णालय बांधल्याने पालिकेने अद्याप रुग्णालयाला भोगवटा दाखला दिलेला नाही.अशातच ते रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बेकायदेशीर ठरलेल्या रुग्णालयावर कारवाई करुन दवाखान्याची जागा पालिकेला त्वरीत हस्तांतरीत करण्यात यावी, या मागणीसावी स्थानिक समाजसेवक प्रदिप जंगम यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये बेमुदत उपोषण सुरु केले होते. त्यावेळी तत्कालिन नगररचनाकार दिलिप घेवारे यांनी रुग्णालयासह त्याचे वास्तुविशारद बॉम्बे आर्किटेक्चरल कन्सलटन्ट यांना पत्रव्यवहार करुन तीन महिन्यांत पालिकेला दवाखाना बांधुन देण्याची कार्यवाही पुर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्यापपर्यंत ती जागा पालिकेच्या ताब्यात न आल्याने तसेच रुग्णालय बांधकामापोटी पालिकेला देय असलेली जागा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी मुळ आरक्षणातच फेरबदल करण्याचा प्रस्ताव आजच्या महासभेत प्रशासनाऐवजी सत्ताधारी भाजपाकडुन मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्याचा गोषवारा अद्याप जाहिर करण्यात आला नसल्याने त्याचे गौडबंगाल अद्याप स्वपक्षीय नगरसेवकांपर्यंत पोहोचलेच नाही.त्यामुळे ते अनभिज्ञ असल्याने केवळ एका स्थानिक नेत्याच्या रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित करुन त्याच्या आरक्षण फेरबदलही रद्द करावे, अशी मागणी करण्याबाबत त्यांना प्रशिक्षण दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे या फेरबदलाचा प्रस्ताव आजच्या महासभेत गाजण्याची चिन्हे निर्माण झाली असली तरी भाजपा बहुमताच्या जोरावर त्यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या हे रुग्णालय फॅमिली केअर या संस्थेला चालविण्यास दिल्याचे सुत्राकडुन सांगण्यात आले आहे.