ठाणे : मुंब्रा बायपासजवळील खालील भागात राहणाऱ्या रहिवाशांना दरपावसाळ्यात दरड कोसळण्याच्या भीतीला सामोरे जावे लागत होते. मात्र, ठाणे महापालिकेने आता येथील विविध भागांसाठी तब्बल १३ ठिकाणी आरसीसीच्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यातील बहुतेक भिंतीचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे दोन हजार ६६९ रहिवाशांचा टांगणीला लागलेला जीव आता सुरक्षेच्या छायेखाली आला आहे.
मुंब्रा तसेच आजूबाजूच्या डोंगराच्या पायथ्याखाली असलेल्या रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात आपला जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. बुधवारी कळव्यातील आतकोनेश्वरनगर भागात दरड कोसळून दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, भविष्यात अशी हानी होऊ नये, यासाठी पालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यानुसार, मुंब्रा बायपासजवळील काही भागांत डोंगराच्या पायथ्याशी सुमारे दोन ते सहा मीटर उंचीच्या आरसीसी पद्धतीच्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यानुसार, आतापर्यंत १३ भिंतींचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. यामध्ये २५ मीटरच्या तीन, नऊ मीटरची एक, ११ मीटरची एक आणि १२ मीटरच्या उर्वरित संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यामुळे गीते कम्पाउंड, नाशिक, एकतानगर, मुंब्रादेवी-१ आणि २ आणि रेतीबंदर आदी भागांत या संरक्षक भिंती उभारण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. यामुळे २६६९ रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.