ठाणे: ठाण्यात रोज विक्रमी संख्येने कोरोनाग्रस्तांची संख्य वाढत असताना आज एकाच दिवशी ६२४ इतक्या विक्रमी संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ठाण्यासाठी दिलासा देणारी ही गुडन्यूज असल्याने कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या आरोग्ययंत्रणचे यामुळे मनोबल वाढले आहे.
अनलॉकनंतर ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रोज ३०० ते ४०० रुग्णांची भर पडत आहे. आजही २६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ३ हजार ८५८ रुग्ण उपचार घेत आहेत. वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येमुळे शहरामध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊनही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणेकर ‘गॅस’वर असतानाच एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. पालिकेने जाहिर केलेल्या अहवालानुसार आज कोरोनाशी दोन हात करून तब्बल ६२४ रुग्णांची घरवापसी झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच इतक्या विक्रमी संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
रिकव्हरी रेट ५४ टक्क्यांवर
दोन आठवड्यापूर्वी ठाण्याचा रिकव्हरी रेट ५० टक्यांवर पोहचला होता. दर चार दिवसांनी त्यात एक टक्का वाढत असतानाच अचानक शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येनेही उच्चांक गाठण्यास सुरुवात केली. त्यामुळे ठाण्याचा रिकव्हरी रेट घसरला होता. मात्र आज एकाच दिवशी ६२४ रुग्ण बरे झाल्याने रिकव्हरी रेट ५४ टक्क्यावर पोहचला आहे.