डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीसमस्येला जबाबदार कोण, असा सवाल नांदिवली येथील त्रस्त रहिवाशांनी केला. केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन बुधवारी नांदिवलीचा पाहणी दौरा करणार होते. परंतु, ऐनवेळी तो त्यांना रद्द करावा लागल्याने महिला संतप्त झाल्या. रवींद्रन यांनी पळपुटेपणा का केला, असा सवाल करताना त्यांनी नगरसेविका प्रेमा म्हात्रे व शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांना घेराव घातला.नांदिवली परिसरातील पाणीटंचाईबाबत रहिवाशांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी रवींद्रन यांनी नगरसेविका म्हात्रेंच्या मागणीनुसार बुधवारी सकाळी १० वाजता पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यानुसार, रवींद्रन यांचे स्वागत तसेच त्यांना समस्या सांगण्यासाठी नागरिक जमले होते. मात्र, ११.३० नंतरही आयुक्त आले नाहीत. त्यामुळे रहिवासी संतापले. म्हात्रे यांनी आयुक्तांच्या कार्यालयाशी संपर्क साधला, तेव्हा रवींद्रन अचानक एमएमआरडीएच्या बैठकीला गेले आहेत. २३ फेब्रुवारीनंतर पाहणी दौरा करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे म्हात्रे यांनी आयुक्तांशी बोलून खात्रीही केली. मात्र, जमावाला शांत करताना नगरसेविका म्हात्रे व शाखाप्रमुख धनंजय म्हात्रे यांच्या नाकीनऊ आले. रवींद्रन यांच्यासह महापालिका प्रशासनाच्या या पळपुट्या धोरणाचा जमावाने निषेध केला. २३ फेब्रुवारीला आयुक्त न आल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
आयुक्त गैरहजर; महिला संतप्त
By admin | Published: February 16, 2017 2:02 AM