उल्हासनगर : दिवाळी दरम्यान शहर कचरामुक्त राहण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी सहायक सार्वजनिक अधिकारी व मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्यासह शहरात पाहणी केली. यावेळी त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्या जवळ उभे राहून ठेकेदाराला कचरा उचलण्यास भाग पाडले.
उल्हासनगरात दिवाळी सणा दरम्यान अनेक ठिकाणी कचरा साचल्याच्या तक्रारी आयुक्त अजीज शेख यांच्याकडे आल्यानंतर, त्यांनी शनिवारी संपूर्ण शहराची पाहणी करून, साचलेला कचरा उचलण्यास ठेकेदाराला भाग पाडले. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्याने शहर स्वच्छ व सुंदर झाल्याचे चित्र शहरात आहे. टॉउन हॉल शेजारील कचऱ्याच्या कुंडी जवळ स्वतः आयुक्त अजीज शेख थांबून साचलेला कचरा उचले पर्यंत ते हटले नसल्याचे चित्र नागरिक पाहत होते. त्यांच्या सोबत सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वछता निरीक्षक विनोद केणी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, ठेकेदारांचे कचरा उचलणारे कर्मचारी यांच्या सोबत आयुक्तांनी संवाद साधून त्यांच्या समस्या एकून घेतल्या आहेत.
महापालिका प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील सफाईचे प्रायोगिकतत्वावर खाजगीकरण केल्यानंतर, प्रभाग स्वच्छ व सुंदर असायला हवा होता. मात्र स्थानिक विविध पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्ते, नागरिकांनी सफाई बाबत नाराजी व्यक्त केल्याने, प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत सफाई खाजगीकरण वादात सापडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक व त्या प्रभागातील रहिवासी धनंजय बोडारे यांनी सफाई खाजगीकरणावर उघडउघड टीका केली. आयुक्त अजीज शेख यांनी प्रभाग क्रं-३ मधील स्वच्छतेची पाहणी केली.
दिवाळीनंतर आयुक्त सफाई खाजगीकरण बाबत काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकट्या प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील सफाईवर महापालिका वर्षाला ११ कोटी खर्च करीत आहे. गेल्यावर्षी महापालिकेच्या आहे त्या कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवले होते. असे असतांना सफाईचा घाटाबाबत चर्चेला उधाण आले आहे.