लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मागील अनेक दिवसांपासून ठाण्यात अनधिकृत फेरीवाले आणि रिक्षावाले हा चर्चेचा विषय बनला असताना ठाण्यातील स्टेशन परिसरात अवैधरीत्या भाडे आकारून प्रवाशांना त्रास देणाऱ्या मुजोर रिक्षावाल्यांविरोधात भाजपा पुढे सरसावली आहे. सोमवारपासून भाजपाने शेअर रिक्षा तसेच रिक्षावाल्यांविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. एकीकडे राज्यात भाजपाचे सरकार असताना दुसरीकडे ठाण्यातील नौपाडा परिसरात भाजपाचे नगरसेवक संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत असल्याने आयुक्तांच्या मोहिमेत भाजपादेखील सामील झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ठाणे शहरामध्ये आजघडीला ४० हजारांहून अधिक अधिकृत आणि अनधिकृत अशा रिक्षा आहेत. त्यातच वाढत्या शहराबरोबर नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असताना अंतर्गत वाहतुकीसाठी शेअर रिक्षाचा पर्याय ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने ठेवला होता. परंतु, शहरातील शेअर रिक्षाथांब्यांवर नियमापेक्षा जास्त रिक्षा उभ्या राहत असून त्यातच त्यात ३ पेक्षा अधिक प्रवासी बसवले जातात. प्रवाशांसोबत रिक्षाचालक अरेरावी करत असल्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत. ते रस्त्यावरच उभे राहत असल्याने संध्याकाळच्या सुमारास चालण्यासाठी जागा नसल्यामुळे ठाणेकरांकडून नाराजी व्यक्त केली आहे. अशा मुजोर रिक्षाचालकांविरोधात एकीकडे पालिका आयुक्तांनी कठोर कारवाई सुरू केली असताना आता त्यात भाजपानेही उडी घेतली आहे. वाहतूककोंडीला रिक्षाचालक जबाबदार असले, तरी आम्हाला योग्य जागा द्या. त्यामुळे आमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतो, अशी मागणी ठाण्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी करत आहेत. भाजपाने मात्र स्थानिक नागरिकांना ज्या मुजोर रिक्षाचालकांचा त्रास होतो, अशांविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून येत्या महिनाभरात त्यांना शिस्त लागली नाही, तर वेगळ्या प्रकारे आंदोलन छेडण्याचा इशारा वाघुले यांनी दिला आहे.ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रविवारी ठाण्यात कारवाई करताना मवाळ भूमिका घेतल्यानंतर दुसरीकडे मात्र भाजपाने स्वाक्षरी मोहीम राबवण्याबरोबरच आंदोलनाचा इशारा दिल्याने हे प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. यामध्ये वाहतूक विभाग अजूनही ठोस भूमिका घेत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे : स्टेशन रोड, गोखले रोड, राममारुती रोड, सुभाष पथ या परिसरात बऱ्याच वेळेला खाजगी वाहनचालक, रिक्षाचालक आपली वाहने अनधिकृतरीत्या उभी करतात. याचा नाहक त्रास अन्य वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागतो. या अनधिकृत पार्किंगबाबत वारंवार तक्र ारी प्राप्त झाल्याने अशा वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले.ठाणे शहरात मागील पाच दिवसांपासून सातत्याने स्टेशन रोड, सॅटीस, गोखले रोड, राममारु ती रोड, सुभाष पथ, वर्तकनगर, शास्त्रीनगर, तुळशीधाम, हिरानंदानी मेडोज या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेमार्फत कारवाई सुरू आहे.या दरम्यान बऱ्याच ठिकाणी खाजगी वाहने, रिक्षा, मोटारसायकल, स्कूटर्स आदी वाहने अनधिकृतरीत्या पार्किंग करण्यात येत असून त्याचा त्रास इतर वाहनचालक व नागरिकांना होत असल्याचा तक्र ारी महापालिका आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या.त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी महापालिकेमध्ये संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजिली होती. या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधितांना आदेश दिले. बैठकीला वाहतूक शाखेचे उपआयुक्त संदीप पालवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, उपआयुक्त संजय निपाणे, उपआयुक्त ओमप्रकाश दिवटे हे उपस्थित होते.
आयुक्तांना भाजपाची साथ
By admin | Published: May 16, 2017 12:10 AM