कल्याण : केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांना बसण्याकरिता सध्या असलेल्या कक्षावरच आयुक्त कार्यालयाने अतिक्रमण केले आहे. आयुक्तांच्या विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) चे दालन उभे करण्याकरिता अभ्यागत कक्षाचा बळी देण्यास विरोध केला जात आहे.आयुक्त रवींद्रन यांनी अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकांना नोटिसा बजावण्याची धडक कारवाई सुरू केली. मात्र, आपल्याच दालनालगतचा अभ्यागत कक्ष गिळण्याची कृती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केडीएमसी क्षेत्रात सद्य:स्थितीला अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गहन होत चालला आहे. यात काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे यांना त्यांचे नगरसेवकपद गमवावे लागले आहे. तर, नुकतीच आयुक्तांनी भाजपचे खडकपाड्याचे नगरसेवक अर्जुन भोईर यांनादेखील अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली आहे.मात्र, त्याच वेळी आयुक्तांनी आपल्या ओएसडीकरिता आपल्याच दालनालगत कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू केले. आयुक्तांचे ओएसडी म्हणून अतिरिक्त कार्यभार असलेले सहा. आयुक्त संजय शिंदे यांच्यासाठी हे दालन उभारले जात आहे. या दालनामुळे आता आयुक्तांच्या भेटीकरिता येणारे नागरिक कुठे बसणार, असा सवाल उपस्थित होत आहे. माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी त्यांच्या कार्यकाळात आयुक्तांच्या दालनात फेरबदल केले. त्या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी हरकत घेतल्याने सोनवणे यांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. आयुक्त रवींद्रन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक भोसले यांनी आयुक्तांचे ओएसडी तसेच कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी दालन उभारले जात असून कार्यालयांतर्गत फेरबदल करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. तसेच आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था केल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
अभ्यागतांच्या जागेवर आयुक्तांचे अतिक्रमण
By admin | Published: December 24, 2015 1:38 AM