लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - जुलै महिन्यात गुन्ह्यांची उत्कृष्ट उकल केल्या बद्दल मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ७ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी पुरस्कार देत कौतुक केले . सदर मासिक बैठकीत गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला .
नालासोपारा येथे दुचाकीचा आरसा लागला म्हणून राजेश यादव ची हत्या केलेल्या तीन आरोपीना ८ तासात पकडण्यात आले होते . तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे , माध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल राख व पोलीस पथकास उत्कृष्ट तपास बद्दल पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले .
वालिव पोलिसांनी ४६ हजारांच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत तब्बल १७ गुन्हे केलेल्या चार जणांच्या टोळीला पकडून साडे पाच लाखांचा ऐवज हस्तगत केला म्हणून तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिले .
बँकेतून कर्ज मिळवून देण्यासाठी कॅन्सल धनादेश घेऊन ते लबाडीने वटवून फसवणूक केल्या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी कौशल्याने तपास करत पश्चिम बंगाल , झारखंड मधील ५ आरोपीना अटक केली . श्या प्रकारे केलेले ४ गुन्हे उघडकीस आणले बद्दल तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह बागल व पथकास तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले .
हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असणारा आरोपी सय्यद आफताब हसन हा संचित रजा घेऊन पसार झाला असता गुन्हे शाखा १ च्या पथकाने त्याला मध्यप्रदेश म्हणून पकडून आणल्या बद्दल पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांना स्पेशल रिवॉर्ड चे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले .
वसईच्या येथील घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीना अटक करून त्यांनी केलेले ६ गुन्हे उघडकीस आणल्या प्रकरणी वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित आंधळे यांना स्पेशल रिवॉर्ड २ चा पुरस्कार दिला .
वसईच्या मालजीपाडा येथील भंगार विक्रेत्यास घरात घुसून चाकूच्या धाकाने लुटल्याच्या गुन्ह्याचा तपास करून लूट करणाऱ्या ३ आरोपीना अटक करत ४ गुन्हे उघडकीस आणल्या बद्दल वसई गुन्हे शाखा २ चे निरीक्षक शाहूराज रणावरे यांना स्पेशल रिवॉर्ड ३ चे पारितोषिक मिळाले .
भाईंदरच्या एका दाताच्या दवाखान्यात सर्जरी आदींचे ३५ लाखांचे सामान कमर्चारीने चुकून दुसऱ्या गाडीच्या डिकीत ठेवले होते . सीसीटीव्ही फुटेज व तपासाचे कौशल्य दाखवून पोलिसांनी सामान मिळवून दिल्या बद्दल नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांना स्पेशल रिवॉर्ड ४ चे पारितोषिक आयुक्तांनी दिले .