मीरारोड - संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगत आदिवासी व सरकारी जागेत वसलेल्या वस्ती मधील नैसर्गिक ओढ्यात झालेल्या अतिक्रमण मुळे दरवर्षी पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरून जीवित व वित्त हानी होण्याच्या घटना घडतात. 'वॉक विथ कमिश्नर' उपक्रमा अंतर्गत या भागाची पाहणी केल्यानंतर येथील नाल्याची रुंदी वाढवण्यासह बाधितांचे पुनवर्सन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
काशीमीरा भागातील महाजन वाडी परिसरातील सरकारी व आदिवासी जमिनींवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे महापालिका, महसूल व स्थानिक नेते - लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने होत आली आहेत. सदर बेकायदा बांधकामांवर कारवाई ऐवजी त्यांना संरक्षण देण्यासह सर्व सोयी सुविधा पालिकेने नगरसेवकांच्या संगनमताने दिल्या आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून फोफावलेल्या या बेकायदा बांधकामांचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो.
जंगलातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा वाहून येतो. पूर्वी या ठिकाणी नैसर्गिक ओढा होता . तसेच जंगला लगतचा हा परिसर निसर्गरम्य मोकळा होता. परंतु साधारण २००० सालापासून स्थानिक भूमाफिया, नेते मंडळींनी महापालिकेच्या व महसूल विभागाच्या संगनमताने बेकायदेशीर बांधकामे सरकारी व आदिवासी जागेत सुरु केली. हळूहळू बेकायदा बांधकामे वाढ जाऊन येथे प्रचंड मोठी झोपडपट्टी तयार झाली आहे. महाविष्णू मंदिर मागील सरकारी तलाव सुद्धा माफियांनी बुजवण्यास घेतला आहे.
मोकळ्या जागेत व नैसर्गिक ओढ्यात भराव होऊन बेकायदा बांधकामे झाली. पालिकेने देखील ओढ्याचा नाला करून टाकला. सदर नाला अरुंद झाला आहे. त्यामुळेच पावसाळ्यात येणाऱ्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात येथील काही बांधकामे पडून अनेकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे नुकसान होणे, वाहने वाहून जाणे आदी प्रकार तर दरवर्षीचे झाले आहेत.
पावसाळा दरम्यान दरवर्षी महाजनवाडी, बापा सीताराम, गावदेवी, महाविष्णू मंदिर या परिसरात पाणी साचून निर्माण होणाऱ्या समस्ये बाबत बापा सीताराम चाळ येथील पालिका नाल्याची आयुक्त दिलीप ढोले यांनी त्यांच्या 'वॉक विथ कमिश्नर' उपक्रमा अंतर्गत या भागाची पाहणी केली. नाल्यात कचरा साचला होता.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त अजित मुठे, मारुती गायकवाड व संजय शिंदे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे व दीपक खांबीत, सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव, अतिक्रमण विभाग नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत, उद्यान अधिक्षक नागेश इरकर, स्वच्छता अधिक्षक राजकुमार कांबळे, जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यतः सदर नाला हा अरुंद असल्याने सर्वत्र पाणी भरते. याकरिता सदर नाला रुंदीकरणासह नव्याने नाला बांधण्यासाठी सर्वेक्षण करावे. तसेच नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घरांचे सर्वेक्षण करून त्यांना स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्त यांनी कार्यकारी अभियंता दिपक खांबित यांना दिले असल्याचे पालिकेच्या जनसंपर्क विभागाने कळवले आहे.