उल्हासनगर : कोरोना स्वाब अहवाला पूर्वी संशयीत रूग्णाच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असून आयुक्तांनी शहरातील एकूण मृत्यू दर विचारात घ्यावा. अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांसह समाजसेवक व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे. उल्हासनगरात एकूण कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ३६०० पेक्षा जास्त झाली असून रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांचे हेळसांड होत आहे. कोरोना संसर्गाने आतापर्यंत एकूण ६२ जणांचा मृत्यु झाला. असा आकडा महापालिका प्रशासनाने जाहीर केला. प्रत्यक्षात स्मशानभूमीत संशयित मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा मोठा असून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटींग लागल्याची परिस्थिती आहे. असे मत समाजसेवक शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले असून एकूण मृत्यू दराकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे, असे सुचविले आहे.
ज्या नागरिकांचा स्वाब टेस्ट येण्यापूर्वी मृत्यू होतो. यांची मृत्यू नंतर स्वाब चाचणी घेतली जात नाही. त्यामुळे तो निगेटिव्ह आहे की, पोजिटीव्ह हे उघड होत नसल्याचे शिवाजी रगडे यांचे म्हणणे आहे. अशा संशयित मयत व्यक्तीच्या घरातील सदस्यांची स्वाब चाचणी केली जात नसल्याने, कोरोना संसर्ग कुटुंबासह इतरांना होण्याची भीती व्यक्त होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात शहरात मृत्यू होत आहेत, स्मशानभूमीतील मृत्युचे रेकॉर्ड तपासले असता. गेल्या वर्षीपेक्षा जास्त मृत्यू, यावर्षीच्या रेकॉर्ड वहीमध्ये नोंदविल्यांचे उघड होते. तरीही झालेले मृत्यू हे कोरोना संसर्गाने झाले की नाही? याची दखल महापालिकेने घ्यायला हवी. असे मत व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक छटलानी यांनी व्यक्त केले. तसेच घरी होम क्वारंटाईन केलेले रुग्ण महापालिका व डॉक्टरांनी दिलेले नियम पाळत नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील इतरांना संसर्ग होत असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे महापालिका आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नाकर्त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटींग
शहरातील शांतीनगर स्मशानभूमित ७ जुलै रोजी एकुण १० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले होते. त्यापैकी किती संशयित कोरोना रुग्ण होते. संशयित रुग्ण असतील तर त्यांचा तपासणी साठी कोरोना स्वाब घेतला का? आदी अनेक प्रश्न निर्माण होत असून इतर स्मशानभूमीची अशीच भयाण परिस्थिति आहे. असे मत शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले आहे.