- पंढरीनाथ कुंभारभिवंडी- महानगरपालिका क्षेत्रांतील समस्या व तक्रारीच्या निमित्ताने नागरिकांसह नगरसेवकांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीची दखल न घेत कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी आयुक्त योगेश म्हसे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विभाग प्रमुखांवर दंडनीय कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सुमारे दिड लाखापेक्षा जास्त दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून परस्पर कपात केल्याने पालिका वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
राज्यात प्रथमच महानगरपालिका प्रशासनात इतकी मोठी दंडनीय कारवाई केल्याची चर्चा शहरात पसरली आहे.या दंडनीय कारवाईत उपायुक्त,सहाय्यक आयुक्त व विभागप्रमुखांचा समावेश आहे.गेल्या सहा महिन्यापासून शहरात पाणी,कचरा,रस्ते व आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यामुळे त्रस्त नागरिकांसह नगरसेवक,महापौर व सामाजीक संस्थांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या.या तक्रारींची दखल न घेता विहित मुदतीत पत्राची पोहोच व माहिती पुरविण्यास अधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांनी दिरंगाई केली.त्यामुळे काही नगरसेवकांनी आयुक्त योगेश म्हसे यांना विचारणा केली. तेव्हा आयुक्त म्हसे यांनी तातडीने महापौरांकडे बैठक बोलावून आढावा घेतला असता सुमारे १५० पत्रांना अधिकारी व विभाप्रमुखांनी संबधितांना उत्तरे देण्याची व समस्या निवारण्याची तसदी घेतली नसल्याचे आढळून आले. याबाबत आयुक्त म्हसे यांनी दोन दिवसांनी आढावा बैठक बोलावून वरिष्ठ अधिकासह विभागप्रमुखांची कानउघडणी केली. तसेच कामात हलगर्जीपणा केल्याबाबत तुमच्यावर का कारवाई करू नये?,अशी नोटीसही बजावल्या.त्याचबरोबर अधिकारी व विभाप्रमुखांच्या नावांची यादी बनवून संबधित सर्व अधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांना विहित वेळेत उत्तर न दिलेल्या एक हजार रूपये दंड आकारण्याच्या सूचना दिल्या.
दंडाची रक्कम त्यांच्या थेट पगारातून कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले.त्याचप्रमाणे या पुढे कामांत कसुर केल्यास दंडाची रक्कम दुप्पटीने आकारली जाईल,अशी तंबी देखील आयुक्तांनी झालेल्या मिटींगमध्ये उपस्थितांना दिली.या दंडनीय कारवाईत शहर अभियंता संदिप सोमाणी,कार्यकारी अभियंता एस.एम.निकम,उपायुक्त अनिल डोंगरे,सहा.आयुक्त वंदना गुळवे,विद्युत विभागाचे शेख सिध्दीक चाँद,माहिती व जनसंपर्क अधिकारी सुनिल झळके,आरोग्य अधिकारी डॉ.विद्या शेट्टी,सहा.आयुक्त सुभाष भोई,आस्थापना प्रमुख नितीन पाटील,अग्निशामक दल अधिकारी डी.एन साळवी,उद्यान विभाग प्रमुख एन.एन.संख्ये अशा ५० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.त्यामुळे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी चांगलेच बिथरले असुन आयुक्तांनी केलेल्या या कडक कारवाईचे शहरातील नागरिकांनी व नगरसेवकांनी स्वागत केले आहे.