ठाणे - आयुक्तांनी महापौरांची जाहीर माफी या मुद्यावरुन सोमवार पासून सुरु असलेले ठाणे मतदाता जागरण अभियानच्या उन्मेश बागवे यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच होते. या आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी महापौरांची भेट घेऊन जो पर्यंत आयुक्त तुमची किंबहुना ठाणेकरांची माफी मागत नाहीत, तो पर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महासभेला गैरहजर राहून आयुक्तांनी तसेच संपूर्ण प्रशासनाने ठाणे शहराच्या पहिल्या नागरीक म्हणजेच महापौरांचा अपमान केला आहे. हे त्यांचा अपमान नसून समस्त ठाणेकरांचाच अपमान असल्याची भुमिका घेत बागवे यांनी सोमवार पासून पालिका मुख्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील त्यांचे हे आंदोलन सुरुच होते. त्यांच्या या आंदोलनाला आता शहरातील अनेक दक्ष नागरीकांचा पाठींबा मिळू लागला आहे. दरम्यान मंगळवारी आंदोलन सुरु असतांनाच महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले होते. या भेटीदरम्यान उन्मेश बागवे, अनिल शाळीग्राम आणि वंदना शिंदे यांनी या सत्याग्रहाची भूमिका महापौरांसमोर विशद केली. सभागृहात उपस्थित न राहता महापौरांचा अवमान करणाऱ्या आयुक्तांच्या जाहीर निषेध करत याविरोधात आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उन्मेष बागवे यांनी यावेळी दिला आहे. महापौर या शहराच्या प्रथम नागरिक असून त्यांचा अपमान म्हणजे सर्व ठाणेकरांचा अपमान त्यांनी संपूर्ण ठाणेकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनाला महापौरांनी देखील जाहीर पाठींबा द्यावा अशी इच्छा आंदोलनकर्त्यांनी महापौरांकडे व्यक्त केली आहे. महापौरांनी या आंदोलनाला पाठींबा दिला असला तरी सहभागी होण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन त्यांना दिले नाही.
आयुक्तांनी समस्त ठाणेकरांची जाहीर माफी मागावी, दुसऱ्या दिवशीही सत्याग्रह आंदोलन सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 4:28 PM
आयुक्तांनी महापौरांची माफी मागावी यासाठी दक्ष नागरीक उन्मेश बागवे यांनी सुरु केलेले सत्याग्रह आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच होते.
ठळक मुद्देवेळ पडल्यास उग्र आंदोलन छेडले जाईलमहापौरांची घेतली भेट