मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रभाग समिती १ च्या कार्यालयास दिलेल्या अचानक भेटीत वेळेत कामावर न आलेल्या १४ अधिकारी - कर्मचारी यांची गैरहजेरी लावत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
प्रभाग कार्यालयात काही कर्मचारी वेळेत हजर राहत नाही अश्या प्रकारच्या तक्रारी येत असल्याने आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी प्रभाग समिती क्रमांक १ च्या कार्यालयास शुक्रवारी अचानक भेट दिली. आयुक्तांनी कामकाज व कार्यालयाची पाहणी करत असताना हजेरी रजिस्टरची तपासणी केली. तपासणीत वेळेत कार्यालयास उपस्थित न राहणाऱ्या १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आयुक्तांनी लावून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
कार्यालयात ठिकठिकाणी पडलेल्या फाईली पाहून आयुक्तांनी अतिरिक्त फाईलचा साठा कुठेही न ठेवता त्यासाठी व्यवस्था करून घेण्याच्या सूचना दिल्या. प्रभाग कार्यालय परिसरात नियमित साफसफाई व स्वच्छता ठेवण्याचे निर्देश आयुक्त ढोले यांनी कर्मचाऱ्यांना दिले.