ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्हॉट्सअॅपवर अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या टीकेचे शुक्रवारी सर्वसाधारण सभेत तीव्र पडसाद उमटले. महिला सदस्यांनी आयुक्तांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यामुळे महापौरांनी अर्ध्या तासाकरिता कामकाज तहकूब केले. सचिव अशोक बुरपुल्ले यांनी आपण कायदेशीर सल्ला घेऊन आयुक्तांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे जाहीर केल्याने अधिकारी विरुद्ध आयुक्त संघर्ष चिघळला आहे.
अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांबाबत आयुक्तांनी अपशब्दांचा वापर केला असून ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा संदेश पाठवला आहे, त्यात महिला अधिकारी असल्याने सभागृहातील नगरसेविका कमालीच्या संतप्त झाल्या. अशा प्रकारे महिलांसंदर्भात आयुक्त अपशब्द वापरत असतील, तर त्यांच्यावर कारवाईची मागणी नगरसेविकांनी केली. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा जो संदेश व्हायरल झाला आहे, तो नेमका काय आहे, हे सभागृहाला समजले पाहिजे, अशी मागणी करुन, त्यांनी या प्रकाराचा निषेध केला. नगरसेवक देवराम भोईर यांनीही निषेध करून ३५ वर्षांमध्ये अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे वैयक्तिक स्वरूपाची हीन टीका झाली नसल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी केल्यानंतर, अधिकाºयांच्या महिला कुटुंबीयांसंदर्भात आयुक्तांनी वादग्रस्त विधान केल्याची कबुली सचिवांनी दिली. त्यामुळे महापौरांनी सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली.अर्ध्या तासानंतर सभा पुन्हा सुरू झाल्यावर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हाच मुद्दा लावून धरला. वादग्रस्त विधान करण्याची आयुक्तांची ही पहिलीच वेळ नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता या अधिकाºयांविरोधात वादग्रस्त विधाने केली असली, तरी हेच अधिकारी आयुक्तांच्या इशाºयावर महासभेवर बहिष्कार टाकायचे. आता ते आयुक्तांवर गुन्हा दाखल करणार का, असा प्रश्न शिंदे यांनी अधिकाºयांना विचारला.माजी महापौरांच्या या प्रश्नावर बुरपुल्ले म्हणाले की, आयुक्तांनी व्हॉॅट्सअॅप ग्रुपवर जी वादग्रस्त विधाने केली, त्याविरोधात कायदेशीर सल्ला घेऊन आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नजीकच्या काळात हा वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.आरोपांमागे बदल्यांचे राजकारण - आयुक्तआपल्यावर केल्या जाणाºया आरोपांमागे अधिकाºयांच्या बदल्यांचे राजकारण असल्याचा आरोप पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला आहे. अधिकाºयांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केलेल्या वादग्रस्त विधानांबद्दल खुलासा करताना, माझ्या विधानांचा संपूर्ण विपर्यास केल्याचा दावाही त्यांनी गुरुवारी केला.थर्ड पार्टी आॅडिटमध्ये घनकचरा विभाग आणि सचिव विभागाच्या कामात अनियमितता आढळल्याने अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. याच राजकारणातून आपल्यावर आरोप करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयुक्तांचे आरोप सचिव बुरपुल्ले यांनी फेटाळले आहेत.माझ्या संदेशात कोणाच्याही आईबहिणीविषयी विधान नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे माझ्यावर असा गुन्हा दाखल होणार, असा प्रश्न त्यांनी केला. काही रस्त्यांचे प्रस्ताव परस्पर महापौरांकडून जात असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.महापौरांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ज्या रस्त्यांचे प्रस्ताव घेण्यात आले होते, ते पालकमंत्र्यांचे होते. विकासासाठीच प्रस्ताव घेतले, तर त्यात चूक काय, असा प्रतिप्रश्न महापौरांनी केला. माझा आयुक्तपदाचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी रोजी संपत असून अधिवेशनानंतर दुसरीकडे पदस्थापना होण्याची शक्यता असल्याचे आयुक्तांनी सांगितले.