मीरारोड - आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाकडून मंजूर ४० कोटीच्या अनुदानातून मीरा भाईंदर शहरात होणाऱ्या चार ऑलम्पिक दर्जाच्या तरण तलावांचे काम एका वर्षात पूर्ण करणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी भूमिपूजन प्रसंगी दिली .
शहरातील लोकसंख्या काही लाखांनी वाढली असताना नागरिकांना आवश्यक तरण तलाव नसल्याने आ . सरनाईक यांनी शासना कडे पाठपुरावा करून ४ तरण तलावांच्या कामां साठी ४० कोटी रुपयांचा निधी शासना कडून मंजूर करून आणला आहे . एका तरण तलाव सह आवश्यक सुविधा असलेल्या इमारतीला प्रत्येकी १० कोटींचा खर्च आहे .
शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील सचिन तेंडुलकर मैदानावरील आरक्षण क्रमांक १२२ जवळच्या जागेत, प्रभाग १२ मधील उद्यानाच्या आरक्षण क्रमांक २३० मध्ये व आरक्षण क्रमांक २४२ मध्ये तर प्रभाग क्रमांक १४ काशीमीरा येथील उद्यानासाठीच्या आरक्षण क्रमांक ३६८ मध्ये तरण तलाव बांधण्याच्या कामांचे भूमिपूजन आ . सरनाईक व आयुक्त ढोले यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले .
भाईंदर पूर्वेकडील सचिन तेंडुलकर मैदानात तरण तलावाचे भूमिपूजन झाल्या नंतर आ . सरनाईक म्हणाले कि , पूर्वी येथे कचरा टाकला जात होता तिकडे चांगले मैदान बनवले. आता येथे एका वर्षात तरण तलाव तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटची खेळपट्टी बनवली जाणार आहे. मैदानात असलेल्या सभागृह स्टेजची उंची २ फुटाने वाढवली जाईल. ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी दोन स्वतंत्र खास उद्यानांची निर्मिती केली जाईल. त्यासाठी आमदार निधी देण्याची घोषणा आ. सरनाईक यांनी केली.
नागरिकांची मागणी व गरज लक्षात घेता तरण तलाव पुढील एका वर्षात बांधून तयार होणार आहेत. ते चालविण्याची व त्याची देखभाल - दुरुस्तीचे कामही स्वतः महापालिकाच करेल असे युक्त दिलीप ढोले यांनी सांगितले. तरण तलावांमध्ये नागरिकांना पोहण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी उपक्रम हाती घेतले जातील असे आमदार प्रताप सरनाईक यांनी घोषित केले. यावेळी माजी नगरसेवक राजू भोईर , कमलेश भोईर , विक्रमप्रताप सिंह, शहर अभियंता दिपक खांबित आदी उपस्थित होते .